वरसोली समुद्र किनार्‍यावर रंगणार ‘महाराष्ट्राचा मराठी महोत्सव’,१८ ते २२ डिसेंबरदरम्यान मिळणार विविध कार्य्रकमांची मेजवानी

By Raigad Times    06-Dec-2024
Total Views |
 alibag
 
अलिबाग | अलिबाग तालुक्यातील वरसोली समुद्र किनार्‍यावर ‘महाराष्ट्राचा मराठी महोत्सव’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १८ ते २२ डिसेंबर या कालावधीत हा महोत्सव भरवला जाणार आहे. सामाजिक उपक्रमांसाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली. वरसोली समुद्र किनार्‍यावर आयोजित या महोत्सवात नामवंत कलाकार आपली कला सादर करणार आहेत.
 
याशिवाय विविवध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पहायला मिळणार आहे. टुडेज युथ सोशल फाऊंडेशनच्यावतीने हा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील लाडका डिजे क्रेटेस आणि ‘गुलाबी साडी’, ‘नऊवारी साडी’ फेम गायक संजु राठोड प्रथमच अलिबागमध्ये या महोत्सवाच्यानिमित्ताने येणार आहे. टुडेज युथ सोशल फाऊंडेशन या संस्थेची स्थापना सहा वर्षांपूर्वी करण्यात आली होती.
 
alibag
 
गेली सहा वर्षे ही संस्था आदिवासी विभागातमहिलांच्या आरोग्यविषयक समस्या आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहेत. २५ हजारहून अधिक आदिवासी महिलांना सॅनिटरीपॅड वितरणाचे काम संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे. संस्थेच्या माध्यमातून वर्षभर राबविल्या जाणार्‍या विविध कार्यक्रमांसाठी निधी उभारता यावा, या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.