पनवेल पंचायत समितीतील आधार सेंटर बंद?

By Raigad Times    06-Dec-2024
Total Views |
 MUMBAI
 
नवीन पनवेल | पनवेल पंचायत समितीच्या पहिल्या मजल्यावर गेल्या काही वर्षांपासून आधार सेंटर कार्यान्वित करण्यात आले होते. विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर पनवेल पंचायत समितीत नवीन गटविकास अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली. या गटविकास अधिकार्‍यांनी येथील आधार सेंटर बंद करण्यास सांगितले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आधार कार्ड काढण्यास येत असलेल्या अनेक नागरिकांना येथून परत जावे लागत आहे.
 
पनवेल पंचायत समितीतील उपसभापती यांच्या केबिनमध्ये आधार सेंटर सुरू करण्यात आले होते. प्रशासक असल्याने सभापती आणि उपसभापती यांच्या केबिन रिकामे आहेत. शासकीय फी घेऊन अनेकांना आधार कार्ड दुरुस्ती, नवीन आधार कार्ड, पत्ता बदल करून या ठिकाणाहून मिळत होते. त्यामुळे अनेकजण या ठिकाणी आधार कार्ड काढण्यासाठी येत असतात. इतरत्र आधार कार्ड काढण्यासाठी लूटमार सुरू आहे. जास्तीचे पैसे घेतले जातात. त्यामुळे पंचायत समितीतील आधार कार्ड सेंटर सर्वांचे आधार बनले होते.
 
मात्र गर्दीचे कारण देत गटविकास अधिकारी यांनी हे आधार सेंटर बंद करण्यास सांगितले. त्यामुळे सोमवारपासून येथील आधार कार्ड सेंटर बंद अवस्थेत आहे. यावेळी पर्यायी जागा बघू असे गटविकास अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले मात्र पंचायत समितीच्या खाली एक खोली बंद अवस्थेत आहे. त्या खोलीमध्ये देखील आधार कार्ड सेंटर सुरू होऊ शकते.
 
मे २०२३ मध्ये राज्यातील सर्व पंचायत समित्यांमध्ये आधार केंद्र सुरू करण्याबाबत उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी जिल्हा परिषदेच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकार्‍याना आदेश दिलेले आहेत. त्यानुसार तत्कालीन गटविकास अधिकारी संजय भोये यांनी आधार कार्ड सेंटर सुरू केले.
 
असे असताना देखील पनवेल पंचायत समिती येथील आधार सेंटर बंद करण्यात आले आहे. नव्याने आलेल्या गटविकास अधिकारी यांच्याकडून गर्दीचे कारण देत हे आधार कार्ड सेंटर बंद करण्यात आले असल्याचे बोलले जात आहे. आधार कार्ड सेंटर बंद असल्याने सामान्य नागरिकांना फटका बसत आहे. त्यामुळे हे सेंटर लवकरात लवकर चालू करावे, अशी मागणी केली जात आहे.