पोलादपूरात रसरशीत स्ट्रॉबेरी वेधून घेतेय लक्ष , जमिनीखालील महामार्गामुळे विक्रीसाठी करावी लागते धडपड

By Raigad Times    06-Dec-2024
Total Views |
 poladpur
 
पोलादपूर | पोलादपूर शहरातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रोड तसेच ओव्हरब्रिजवर सध्या महाबळेश्वरची रसरशीत स्ट्रॉबेरी विकण्यासाठी दरवर्षीप्रमाणे काही शेतकरी घेऊन येऊ लागले आहेत. ही लालचूटूक फळे ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. मात्र, जमिनीखालून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग गेल्याने स्ट्रॉबेरीची विक्री जेमतेम होत असून, विक्रेत्यांना धडपड करावी लागत आहे.
 
पोलादपूर तालुयात पावसाळयामध्ये अतिवृष्टी, हिवाळयात कडायाची थंडी आणि उन्हाळयामध्ये प्रचंड उष्णता असे तीनही ॠतू कमालीचे तीव्र स्वरूपात अनुभवावे लागत असतात. यामुळे प्रयोगशील शेतकर्‍यांना शेंगदाणा, हळद, बटाटे, कांदे अशी अपारंपरिक पिके घेण्यास संधी मिळते. मात्र, ही संधी यशस्वी करणारे शेतकरी या पिकांच्या उत्पादनामध्ये सातत्य ठेवत नसल्याचा अनुभव तालुयातील कृषी पर्यवेक्षकांना येत आहे.
 
काही वर्षांपूर्वी मोरगिरी येथील एका प्रयोगशील शेतकर्‍याने दीड-दोन एकर शेतजमीनीवर स्ट्रॉबेरीची लागवड यशस्वी केली. मात्र, बाजारातील मागणी आणि महाबळेश्वर-पांचगणीच्या स्ट्रॉबेरी उत्पादनाशी स्पर्धा यामुळे त्या शेतकर्‍याला स्ट्रॉबेरी लागवडीचे सातत्य टिकविता आले नाही. पोलादपूर एस.टी.स्थानकासमोरील ओव्हरब्रिजवरील हातगाडया तसेच जुन्या पोलीस स्टेशनच्या इमारतीच्या परिसरातील महाबळेश्वर वाई सुरूर रस्त्यावर महाबळेश्वर परिसरातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी रसरशीत लालचूटूक स्ट्रॉबेरी टोपल्यांमधून विकण्यासाठी घेऊन बसतात. सध्या प्रतिकिलो १८० ते २०० रूपये दर आहे.
 
पण स्ट्रॉबेरीचे फळ काहीसे आंबट असल्याने ग्राहकांकडून केवळ हौशीपोटी खरेदी केली जात आहे. शिमग्यापूर्वी या फळाची गोडी अवीट होऊन आवक वाढून दरसुध्दा कमी होतात. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पोलादपूर येथील सर्व्हिसरोडच्या जमिनीखाली तब्बल ३० ते ३५ फूट खोलवरून गेल्याने स्ट्रॉबेरीसाठी महामार्गावरील ग्राहक उपलब्ध होत नसल्याने स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकर्‍यांना सध्या केवळ बाजारपेठ व मागणी टिकवून ठेवण्यासोबत रोज उपलब्ध होणारी स्ट्रॉबेरीची फळे नासून जाण्यापूर्वी विकून प्रवासभाडे व चरितार्थ चालविण्यापुरती कमाई करण्यासाठीच धडपड करावी लागत आहे.