पेण । पेण न्यायालयात आरोपी विरोधात ठोस युक्तिवाद न करण्याकरीता तक्रारदाराकडून 10 हजार रुपयांची लाच घेताना सरकारी वकील अॅड.दिनेश पाटील याला अटक करण्यात आली आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकार्यांनी ही कारवाई केली. तक्रारदार व त्यांच्या मित्राविरोधात पेण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल असून सदर गुन्ह्याचे अनुषंगाने या दोघांनी संबंधित न्यायालयात दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जात मदत तसेच आरोपीविरोधात ठोस युक्तिवाद न करण्यासाठी प्रत्येकी पाच हजार असे एकूण 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी सरकारी वकील दिनेश पाटील यांनी केली होती. याबाबत तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी, 4 डिसेंबर रोजी सापळा रचला. पडताळणीदरम्यान तक्रारदाराकडून दिनेश पाटील यांनी दहा हजारांची लाच पेण न्यायालयात स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना अटक केली आहे.
या कारवाईमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षकि शवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक संजय गोविलकर, अप्पर पोलीस अधीक्षक गजानन राठोड, युनिट नवी मुंबईच्या पोलीस निरीक्षक अरुंधती येळवे, पर्यवेक्षण अधिकारी नितीन प्रभाकर दळवी, पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सपोफौ जाधव, पोलीस नाईकअहिरे, बासरे, विश्वासराव तसेच चालक गायकवाड यांनी सहभाग घेतला.