रायगड जिल्ह्यात निषेध मोर्चे , बांगलादेशधील हिंदूंवरील अत्याचाराविरुद्ध

By Raigad Times    09-Dec-2024
Total Views |
 mangoan
 
माणगाव | बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदू आणि इतर धर्मियांवर होणार्‍या अन्याय, अत्याचाराविरुद्ध भारतीयांमध्ये जनभावना तीव्र आहेत. २ डिसेंबर ते १० डिसेंबर या कालावधीमध्ये सकल हिंदू समाजाच्यावतीने मानवाधिकार आयोग व भारत सरकारने याविषयी लक्ष देऊन अल्पसंख्यांक हिंदू, दलित व इतर धर्मियांचे रक्षण करावे त्यांचे मानवाधिकार सुरक्षित रहावेत यासाठी रायगडात मोर्चे, स्वाक्षरी अभियान राबविण्यात येत आहे.
 
याचाच एक भाग म्हणून माणगाव तालुका सकल हिंदू समाजाच्यावतीने रविवारी, ८ डिसेंबर रोजी माणगाव शहरात बालाजी मंदिर ते प्रांत कार्यालय माणगाव असे बांगलादेश हिंदू न्याय यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चामध्ये माणगाव तालुक्यातील सकल हिंदू समाज, विविध संघटना, हिंदू बांधव सहभागी झाले होते.
 
यावेळी मूकपणे आपल्या भावना व्यक्त करून माणगाव बस स्थानकासमोर मानवी साखळी करण्यात आली होती. हिंदू व अल्पसंख्यांकांचे रक्षण करा, अशा आशयाचे बॅनर घेऊन निघालेल्या या मूक मोर्चाचा समारोप माणगाव प्रांत कार्यालय येथे छोटेखानी सभेत करण्यात आला. या सभेत बांगलादेशी हिंदू व इतर धर्मियांवर होणार्‍या अन्याय अत्याचाराविरुद्ध तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या.
 
भारत सरकारने व मानवाधिकार आयोगाने हिंदू समाजावर होणारा अन्याय अत्याचार कायमस्वरूपी बंद व्हावा यासाठी तहसीलदारांना निवेदन देण्याकरिता स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. तालुक्यातील विविध भागातून या मूक मोर्चाला हिंदू समाज व विविध संघटना उपस्थित होत्या. १० डिसेंबर रोजी सकल हिंदू समाजाच्यावतीने जिल्हाभरात राबविलेल्या स्वाक्षरी अभियानातील सह्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे.