कोंढवी, कोतवालच्या जीर्ण संकुलांचे पुनर्वसन अपेक्षित , उपजिल्हाधिकार्‍यांच्या भेटीनंतर ७७ लाखांचा प्रस्ताव

By Raigad Times    09-Dec-2024
Total Views |
 poladpur
 
पोलादपूर | तालुयातील कोंढवी आणि कोतवाल येथे सिध्दीविनायक ट्रस्टच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या पुनर्वसन संकूलाचा ताबा दरडग्रस्तांना लॉटरीद्वारे देण्यात आला आहे. सिध्दीविनायक ट्रस्टच्या मदतीचा योग्य विनियोग न झाल्याने पोलादपूर तालुका पुनर्वसनास वंचित राहिला आहे. मात्र, सध्या या जिर्णावस्थेत असलेल्या दोन्ही पुनर्वसन संकुलांच्या इमारत सरकार आणि आपद् ग्रस्तांच्या कोत्या मानसिकतेचे द्योतक म्हणून उभ्या आहेत.
 
२५ व २६ जुलै २००५ रोजी या दोन्ही गावांमध्ये भूस्खलनामुळे दरडग्रस्त झालेल्यांसाठीच्या पुनर्वसन संकुलात न राहता दरडप्रवण क्षेत्रातच अद्याप दरडग्रस्त राहात आहेत. पोलादपूरमध्ये काही काळ तहसिलदार राहिलेल्या पुनर्वसन उपजिल्हाधिकारी महोदया या दरडग्रस्त गावांना भेट देऊन पाहणी करूनगेल्यानंतर ७६.९५ लक्ष रूपयांचा प्रस्ताव सादर केल्याची माहिती प्राप्त झाली. मात्र, त्यानंतरही पुनर्वसन संकुलांचे पुनर्वसन कधी होणार याकडे कोंढवी आणि कोतवालच्या दरडग्रस्तांचे लक्षलागले आहे.
 
२५ व २६ जुलै २००५ च्या अतिवृष्टी, महापूर आणि भूस्खलनानंतर तालुयातील कोतवाल बुद्रुकमध्ये ६, कोतवाल खुर्दमध्ये ३ आणि लोहारमाळ-पवारवाडीमध्ये २ जणांचा जमिनीत गाडले गेल्याने मृत्यू झाला. याखेरिज, पोलादपूर तालुयातील कोंढवी येथेही मोठया प्रमाणात भूस्खलन झाल्याने कोतवालसह कोंढवीमधील दरडग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचे आव्हान निर्माण झाले. पुनर्वसनाच्या पहिल्या टप्प्यात पोलादपूर तालुयातील बोरावळे येथील ९ घरांच्या बांधकामानंतर तेथील दरडग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण झाले.
 
सावित्री महिला विकास संस्थेतर्फे पैठण गांवात ३, देवपूर येथे ४, पार्ले येथे ३, माटवण येथे ५, पोलादपूर- जोगेेशरी गाडीतळ येथे ३, सडवली येथे ६, लोहारमाळ येथे ४, रानबाजिरे येथे २३, आड येथे २, सवाद येथे १ आणि हावरे येथे ६ अशी एकूण ६१ घरकुले बांधण्यात येऊन ताबाही देण्यात आला.
 
पोलादपूर येथील चित्रे यांना घरबांधणीसाठी सरकारी अनुदान देण्यात आले. याखेरिज, कोतवाल खुर्द आणि बुद्रुकच्या दरडग्रस्तांसाठी २८ घरकुलं उभी राहतील एवढे क्षेत्र तर कोंढवी येथे २९ घरकुलं उभी राहतील एवढे क्षेत्र उपलब्ध करण्यात येऊन पुनर्वसनाचे प्रयत्न सरकारकडून सुरू झाले. सिध्दीविनायक ट्रस्ट, मुंबईने याकामी खर्चाची जबाबदारी उचलली.
 
कोतवालमध्ये दरडग्रस्तांची संख्या ४८ तर कोंढवी येथे ७८ कुटूंबे अशी असताना दोन्ही ठिकाणी प्रत्येकी ४५ लाख रूपये खर्चातून केवळ १५-१५ घरकुलं उभारण्यात आली. गेल्या तीन-चार वर्षांत कोतवाल येथे घरकुलांपर्यंत जाणारा रस्त्यासाठी भूसंपादन करण्याकामी तत्कालीन तहसिलदारांनी केलेली कुचराई तत्कालीन रायगड जिल्हाधिकारी सुभाष सोनावणे यांनी सिध्दीविनायक ट्रस्टचे विेशस्त सुभाष मयेकर यांच्याहस्ते ५० लाखांचा धनादेश प्रदान करतेवेळी नाराजीसह उघडकेली.
 
मात्र, त्यानंतर कोंढवी आणि कोतवाल येथील घरकुलांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होण्याऐवजी ती दिवसेंदिवस खालावत गेली. दुसर्‍या टप्प्यात मिळालेली रक्कम झालेल्या कामापोटीच मिळाली असे सांगून ठेकेदार त्याठिकाणी फिरकेनासेही झाले. कोंढवी येथे बांधण्यात आलेल्या सिध्दीविनायक ट्रस्टतर्फे बांधण्यात आलेल्या पुनर्वसन घरकुलांचा १५दरडग्रस्तांना लॉटरी पध्दतीने ताबा देण्यात आला. यापैकी ५ जणांनी घरकुलांचा ताबा घेतल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
 
यापैकी ४ जणांनी गृहप्रवेश केला. एकच दरडग्रस्त काहीकाळ वास्तव्यास होता तर अन्य लोक दरडप्रवण क्षेत्रातून येथे स्थलांतरीत झाले नाहीत. कोंढवी येथे पुनर्वसन घरकुलाची किंमत ४९ लाख ४९ हजार ६५१ रूपये एवढी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. कोंढवी आणि कोतवाल या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी २१ घरकुलांची प्रशासकीय मान्यतेनुसार मंजूरी असताना केवळ प्रत्येकी १५ घरकुले बांधण्यात आली आहेत. यातही कोंढवीतील घरकुले बांधण्यात आलेल्या जागेचा वाद उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्याने नजिकच्या काळात तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शयता आहे.