तळोजात तोतया आयकर अधिकारी अडकला गुन्हे शाखेच्या जाळ्यात

By Raigad Times    10-Jan-2025
Total Views |
 panvel
 
पनवेल | बीकेसी आयकर विभागात काम करणारा कंत्राटी चालकच बनावट आयकर अधिकारी म्हणून वावरत या बनावट आयकर अधिकार्‍याला ७ जानेवारीला गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने तळोजातून अटक केली आहे. त्याच्याकडे अनेक आयकार्ड, बनावट शिक्के, नियुक्तीपत्रे व इतर कागदपत्रे सापडली आहेत.
 
त्याने किती लोकांना आयकर विभागात नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली आहे, याचा तपास सुरु असल्याची माहिती गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त अविनाश यांनी बुधवारी (८ जानेवारी) पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.तसेच त्याला वसई न्यायालयात हजर केल्यावर ५ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. संतोष भवनच्या तांडापाडा येथील अजमेरी बिल्डिंगमध्ये राहणार्‍या सफारुद्दीन खान यांच्या मुलीला आयकर विभागाची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून १५ लाख रुपयांची फसवणूक केली होती.
 
रिंकू शर्मा व पासी या दोघांनी त्यांच्या मुलीला आयकर विभागात कामाला लावतो, असे सांगितले होते. त्यांच्या मुलीला आयकर विभागाचे ओळखपत्र व ट्रेनिंगचे पत्र देऊन तिला नोकरीला न लावता आर्थिक फसवणूक केली होती. पेल्हार पोलिसांनी १३ डिसेंबरला गुन्हा दाखल केला होता.
 
याच गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार होते. तपासादरम्यान रिंकू शर्मा हा तळोज्यात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट तीनला मिळाली. आरोपीला पोलिसांनी मंगळवारी सापळा लावून ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यावर २८ बनावट आयकर विभागाचे आयकार्ड, अनेक शिक्के, नियुक्तीपत्रे व इतर कागदपत्रे सापडली.
 
आरोपी पकडल्याची माहिती मिळताच फसवणूक झालेल्या लोकांनी गुन्हे शाखेच्या कार्यालयात गर्दी केली होती. आतापर्यंत ते ४२ नागरिकांसह सुशिक्षित बेरोजगार तरुण, तरुणींना बनावट आयकर निरीक्षकाचे आयकार्ड व नियुक्ती पत्रे देऊन दोन कोटीपेक्षा अधिक रुपयांना गंडा घातला असल्याची माहिती समोर आली आहे.