१०० दिवसांत मान्सूनपूर्व कामांना प्राधान्य द्या -मुख्यमंत्री

By Raigad Times    10-Jan-2025
Total Views |
 mumbai
 
मुंबई | राज्यातील मृद व जलसंधारणांतर्गत माथा ते पायथातत्त्वावर पाणलोटाचा विकास करावा तसेच जलयुक्त शिवार अभियान ३.०, तलाव दुरुस्ती योजना यासह विभागातंर्गत राबविण्यात येणार्‍या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत, आगामी शंभर दिवसांत पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी केल्या. मृद व जलसंधारण विभागाच्या पुढील १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने गुरुवारी (९ जानेवारी) आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
 
तेम्हणाले की, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना,जलयुक्त शिवार अभियान, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना, आदर्शगाव योजना, नवीन जलसंधारण प्रकल्पांची उभारणी व प्रगतीपथावरील प्रकल्प, पूर्ण झालेले प्रकल्पांचे परीक्षण व दुरुस्ती, माजी मालगुजरी पुनरूज्जीवन व दुरुस्ती कार्यक्रम या योजनांमध्ये प्रत्यक्ष सुरू असलेल्या कामांना गती द्यावी.
 
भविष्यकालीन योजनांचे प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करुन त्याला मान्यता घ्यावी. राज्यातील सिंचन क्षेत्र वाढविण्यावर भर देवून त्यासाठी योग्य ते नियोजन करा, विभागातील प्रलंबित कामांचा जलद निपटारा करा, पदभरती, विभागातील उपलब्ध मनुष्यबळाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी प्रशिक्षणांचे आयोजन करावे, निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
 
गाळ काढण्याची कामे मार्च पूर्वी पूर्ण करावीउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्यातील गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अंतर्गत धरणातील गाळ काढून तोच गाळ शेतीसाठी वापरण्याच्या कामांना प्राधान्य देऊन मार्चपर्यंत ही कामे तातडीने पूर्ण करावी. बर्‍याच ठिकाणी गाळ काढल्यानंतर धरणांची पाणी साठवण्याची क्षमता आहे तरी आतापासून ही कामे गतीने केल्यास मार्च अखेर मोठ्या प्रमाणात राज्यातील धरणातील गाळ काढण्याची कामे पूर्ण होतील, अशा सूचना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केल्या.
 
बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्य सचिव (वित्त) विभाग ओ.पी.गुप्ता, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव (नियोजन) राजगोपाल देवरा, प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ.श्रीकर परदेशी, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव गणेश पाटील यावेळी उपस्थित होते.