नवीन पनवेल | पनवेल तालुक्यातील ७१ ग्रामपंचायत हद्दीतील तब्बल ३२ गावांमध्ये रास्त भाव धान्य दुकान नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांना इतर गावांमध्ये धान्य आणण्यासाठी जावे लागत आहे. यात काही आदिवासी वाड्यांचादेखील समावेश आहे.
पनवेल पुरवठा विभाग तहसील कार्यालयाचे हे अपयश आहे. निताळे, कोळवाडी, खैरवाडी, तामसई, कोंडले, दुंदराई, देहरंग, वाघाची वाडी, गाडे, आंबिवली, विहिघर, शिलोत्तर रायचूर, डेरवली, कोळखेपेठ, माची प्रबळ, शेडूंग, पोयंजे कातकरवाडी, जाताडे, दापिवली, चिरवत, देवळोली बुद्रुक, पारगाव डुंगी, वाघिवली, तरघर, पाडेघर, सोनखार, खारकोपर, कर्नाळा, घेराकिल्ला माणिकगड, कालीवली, माडभुवन, कोरळ या ठिकाणी रास्त भाव धान्य नसल्याची माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली.
त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांना इतर गावांमध्ये हेलपाटे घालत धान्य घेण्यासाठी जावे लागते. मोफत धान्य घेण्यासाठी रिक्षा किंवा इतर वाहन करून त्यांना शंभर ते दीडशे रुपये देऊन प्रवास करावा लागतो. गावातल्या गावात रास्त भाव धान्य दुकान नसल्याने अनेकांची परवड होत आहे.
शासनाकडून रास्त भाव दुकान सुरू करण्यासाठी बचत गटाला प्राधान्य दिले जात आहे. मात्र काही ठिकाणी बचत गटांनी देखील रेशनची दुकाने भाड्याने दिले असल्याचे समोर आले आहे. बरीचशी दुकाने काही दिवसांपूरतीच आणि ठराविक वेळेसाठीच उघडी असतात. त्यानंतर ती बंद असतात. त्यामुळे काही लाभार्थ्यांना धान्य मिळत नाही. पुरवठा विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. याबाबत निरीक्षण अधिकारी अश्विनी धनवे यांना विचारले असता, लेखी द्या, त्यानंतर माहिती मिळेल असे सांगितले.