जेएनपीटीला जोडणारा नवा महामार्ग होणार , उरण, पनवेल, खारघर, बेलापूरची वाहतूक कोंडी फुटणार

२९०० कोटींचा खर्च अपेक्षित ; किमी लांबीचा महामार्ग

By Raigad Times    11-Jan-2025
Total Views |
 uran
 
उरण | देशातील अग्रणी पाचपैकी एक बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू बंदरावर (जेएनपीए) येणार्‍या कंटेनरची बेलापूर, खारघर, पनवेल भागातील वर्दळ कमी करण्यासाठी जेएनपीए ते जुना पुणे महामार्ग असा नवा विशेष महामार्ग तयार होणार आहे. यासाठी २ हजार ९०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
 
हा मार्ग चिरनेर गावाजवळून जात असल्याने या परिसरातील जमिनी खरेदी करण्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. जेएनपीएवर दररोज पाच हजारहून अधिक कंटेनर व ट्रक पुणे दिशेने येतात. तितकेच ट्रक उत्तरेकडून ठाणे दिशेने येतात. या दोन्ही बाजूंनी ट्रक ठाणे-बेलापूर रस्ता किंवा पुणे द्रुतगती मार्गावरुन पनवेल किंवा बेलापूर, खारघर या भागातील रस्त्यांचा उपयोग करतात. त्यातून कोंडी होते व स्थानिकांनाही त्याचा त्रास होतो. हा त्रास आता लवकरच दूर होणार आहे.
 
uran
 
तसे नियोजन ‘एनएचएआय’ने केले आहे. जेएनपीएजवळील पागोटे ते जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील चौकदरम्यान नवा महामार्ग तयार केला जाणार आहे. ही जागा बेलापूरहून ‘जेएनपीए’कडे येणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर आहे. तेथून चौकपर्यंत २९.२१९ किमी लांबीचा हा नवा महामार्ग असेल. हा महामार्ग बहुतांश उन्नत, जमिनीवरील रस्ता व दोन बोगद्यांचा असेल. ६० मीटर रुंदी व सहा पदरी असा हा महामार्ग असेल.
 
यामुळे दक्षिणेकडून (पुणे दिशेने येणार्‍या) वाहनांना पनवेल किंवा बेलापूरपर्यंत येण्याची गरज नसेल. थेट ‘जेएनपीए’ गाठू शकतील. त्याचप्रमाणे उत्तर दिशेने येणार्‍या वाहनांनाही ठाणे-बेलापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडीपासून मुक्त होऊन जुन्या पुणे महामार्गाने चौकपर्यंत येऊन दहा मिनिटांत ‘जेएनपीए’ गाठणे शक्य होणार आहे. या महामार्गावर चिरनेर, गोवा महामार्ग व मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, असे तीन आंतरबदल असतील. त्याखेरीज ‘अटल सेतू’ने येणारी वाहनेही चिरनेर जवळून हा महामार्ग शकतील.
 
हा पूर्णपणे नवा महामार्ग असल्याने तो ‘एनएचएआय’च्या ‘अ’ वर्ग श्रेणीत ठेवण्यात आला आहे. एकंदरी या महामार्गामुळे चिरनेर गावाला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. एकंदरीत या परिसरात विकासाची गंगा येणार असल्याने खाजगी भांडवलदारांनी या परिसरातील शेतकर्‍यांच्या जमिनी खरेदी विक्री करण्याकडे आपला मोर्चा वळवला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
 
महामार्गाची वैशिष्ट्ये
सहा पदरी बोगदे : दोन
मोठे पूल : सहा
लहान पूल : पाच
उड्डाणपूल : चार
रस्त्यावरील पूल : दोन
बांधकाम कालावधी : ३० महिने
भूसंपादन : १७५ हेक्टर