सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना मिळणार १ तारखेला निवृत्ती वेतन

By Raigad Times    11-Jan-2025
Total Views |
 alibag
 
अलिबाग | रायगड जिल्हा परिषदेतील जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत, त्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. महिन्याच्या एक तारखेस निवृत्तीवेतन मिळण्यासाठी सॉफ्टवेअर विकसीत करण्यात आले असून ते लवकर सुरु होईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य लेखा व वित्त महादेव टेले यांनी दिली. रायगड जिल्हा परिषद कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी संघटना रायगडचा पहिला जिल्हा मेळावा कुरुळ येथे नुकताच पार पडला. याप्रसंगी महादेव टेले बोलत होते.
 
यावेळी लेखाधिकारी सतीश भोळवे, रायगड जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी संघटना अध्यक्ष जी.एच. पाटील आदी उपस्थित होते. यावेळी अध्यक्षस्थानावरुन बोलताना सखाराम पवार यांनी जुन्या आठवणींना दिला. लेखाधिकारी सतीश भोळवे यांनी सेवानिवृत्तांच्या ज्या समस्या आहेत, त्याकडे आपण गांभीर्याने लक्ष देत आलो आहोत आणि देत राहू असे सांगितले.
 
क्षात्रैक्य समाज अलिबागचे अध्यक्ष द्वारकानाथ नाईक यांनी सांगितले की, प्रभाकर पाटील अध्यक्ष असताना निवृत्तीच्या वेळी पेन्शनची ऑर्डर हातात ठेवली जायची. ही प्रथा नंतर बंद पडली. आता संगणक युगात सोय झाली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष प्रकाश नागू म्हात्रे यांनी बोलताना पूर्वी जिल्हा परिषदेच्या कर्मचार्‍यांच्या समस्या निवारण सभेचे आयोजन केले जायचे, त्या सभेचे आयोजन पुन्हा करणे आवश्यक असल्याचे त्यांनी कळकळीने सांगितले.
 
यावेळी सदानंद शळके, बाबुराव देशमुख, शीतल म्हात्रे यांनीही आपले मनोगत व्यक्त प्रारंभी संघटना अध्यक्ष जी.एच. पाटील यांनी संघटनेची पार्श्वभूमी, कार्य याची माहिती दिली. याच मेळाव्यात ८० वर्षे पूर्ण झालेल्या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचा सत्कार करण्यात आला.
 
यावेळी उपाध्यक्ष अजित जाधव, डी. जी. मानकर, सचिव सुरेश म्हात्रे, खजिनदार किशोर घरत, सदानंद शिर्के, जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. कैलास चौलकर, माजी प्रकाश म्हात्रे, डॉ. राजू म्हात्रे, न.मो. घरत, आय.के. दळवी, ए.बी. पाटील, मदन मोरे, नामदेव शिंदे, प्रकाश म्हात्रे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमरदीप ठोंबरे यांनी केले. उपस्थितांचे आभार खजिनदार किशोर म्हात्रे यांनी मानले. या मेळाव्यासाठी रायगड जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून राजिपचे सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते. क्षात्रैक्य समाज हॉल खचाखच भरला होता.