विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव द्या! आ.प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

नवी मुंबई विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी

By Raigad Times    14-Jan-2025
Total Views |
panvel
 
पनवेल | नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी त्या दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत कार्यवाही व्हावी, अशी आग्रही मागणी पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलीआहे.
 
यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनही दिले आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचा १३ जानेवारी जन्मदिवस. दि. १३ जानेवारी रोजी स्व. दि. बा. पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्र शासनातर्फे मुंबईला पर्याय म्हणून ठाणे, पनवेल, उरण तालुयातील गावांमध्ये नवी मुंबई निर्माण करण्याकरिता प्रकल्प राबविण्यात आला.
 
हा प्रकल्प राबवित असताना येथील स्थानिक कष्टकरी, शेतकरी, प्रकल्पग्रस्त वर्ग विस्थापित न होता, त्यांना यथोचित न्याय मिळण्यासाठी दि. बा. पाटील साहेबांनी भूमिपुत्रांसाठी केलेल्या संघर्षाची इतिहासाने नोंद घेतली आहे. केवळ त्यांनी केलेल्या संघर्षामुळेच इथला स्थानिक भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त आज ताठ मानेने उभा आहे व त्याकरिता या तालुयातील प्रकल्पग्रस्त हे कायमस्वरूपी त्यांचे ऋणी आहेत.
 
अशा या दिवंगत लोकनेत्याचे नाव याच परिसरात विकसित होत असलेल्या नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास द्यावे अशी मागणी येथील भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त तसेच लोकप्रतिनिधींकडून सातत्याने होत आहे. स्व. दि. बा. पाटील यांचे नाव या विमानतळाला देण्यात यावे याकरिता गेली अनेक वर्षे प्रकल्पग्रस्तांकडून विविध बैठका, पत्रव्यवहार तसेच विविध आंदोलनांमार्फत सरकारचे या मागणीकडे लक्ष वेधण्याचा सातत्याने प्रयत्न सुरु आहे.
 
या प्रयत्नांमुळेच दि. बा. पाटील साहेब यांचा कर्तृत्वाचा योग्य सन्मान दृष्टीने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ’ हे नाव देण्याचा प्रस्ताव आपल्या नेतृत्त्वाखालील राज्य सरकारने केला आहे, असे नमूद करत त्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करत त्यांचे आभारही मानले आहेत. केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची मध्यंतरी भेट घेतली त्यांनी याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे.
 
तसेच या प्रस्तावासोबतच अन्य विमानतळाचे प्रस्ताव देखील माननीय पंतप्रधान कार्यालयाकडे प्रस्तावित केले असून या सर्वाबाबत एकत्रित निर्णय होणार असल्याचे समजल्याचे सांगितले. तरी आता हा निर्णय लवकरात लवकर म्हणजेच विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी होणे गरजेचे आहे. त्यामुळेच राज्य सरकारमार्फत केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून ही मागणी करणेकरिता केंद्र सरकारला भाग पाडणे आवश्यक आहे.
 
स्व. दि. बा. पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सुरुवातीलाच एप्रिल २०२५ पूर्वी म्हणजे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी केंद्र सरकारने या प्रस्तावास मंजूरी दिल्यास ते दि. बा. पाटील साहेबांच्या कर्तृत्वास अभिवादन ठरेल व शासनातर्फे त्यांच्या कार्याचा योग्य तो सन्मान केल्याचे जाणवणार आहे.सर्व नागरिकांच्या भावनांचा विचार करून विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी लोकनेते दि. बा. पाटील साहेबांच्या नावाच्या या प्रस्तावास केंद्र सरकारने मान्यता द्यावी, याकरिता राज्य सरकारतर्फे आवश्यक तो पाठपुरावा करून सर्व प्रकल्पग्रस्तांना हा आनंद मिळवून द्यावा, असेही आमदार प्रशांत ठाकूर या निवेदनात अधोरेखित केले आहे.