खोपोली | खोपोली-पेण रस्त्याच्या रुंदीकरणासाठी शिळफाटा परिसरात विद्युत लाईनचे जुने खांब हटवून नवीन खांब बसविण्याचे काम सुरू आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी सुतारआळी येथील एका घरावर वीज खांब पडल्याने महिला जखमी झाली आहे.
खोपोली शिळफाटा सुतारआळीसमोर नवीन ठिकाणी बसविलेला खांब येथील लक्ष्मण काशिनाथ काणेकर यांच्या घरावर कोसळला असून यात लक्ष्मी लक्ष्मण काणेकर (वय ५५) जखमी झाल्या आहेत.
सदरचा वीज खांब बसविण्यासाठी काणेकर कुटुंबांनी विरोध दर्शविला होता; मात्र दमबाजी करत काणेकर कुटुंबाच्या घराचा पत्र्याचा काही भाग तोडून घराला खेटूनच हा खांब उभा करण्यात आल्याची माहिती काणेकर कुटुंबांनी दिली आहे. याबाबत या ठेकेदारावर कारवाई करावी व घराच्या नुकसानीबाबत भरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.