पनवेल | आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघांमध्ये जितके मताधिक्य मिळेल तितकी झाडे लावून त्याचे संगोपन आणि संवर्धन करण्याचा संकल्प केला होता. विजयाचा चौकार मारणार्या आ. ठाकूर यांनी ५१ हजार ९१ इतक्या फरकाने निवडणूक जिंकली. त्यानुसार पांडवकडा येथे वृक्षारोपण करुन हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून पनवेलच्या आमदारांनी इतर लोकप्रतिनिधींसमोर पर्यावरणपूरक वस्तूपाठ ठेवला आहे.
मुंबईचे प्रवेशद्वार असणार्या पनवेलला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आले आहे. लवकरच ते कार्यान्वित होणार असून यामुळे पनवेलला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. याव्यतिरिक्त सिडको वसाहती विकसित झालेल्या आहेत. महामार्गाचे विस्तारीकरण होत आहे. उड्डाणपूल बांधण्यात येत आहेत. शहरीकरण झपाट्याने होत असताना वनराई मात्र कमी होत आहे. परिणामी पर्यावरण संतुलन बिघडू लागले आहे. झाडे नसल्याने प्राणवायू मिळणार कसा? असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
राज्यातील सर्वाधिक मतदार संख्या असणार्या मतदारसंघापैकी एक असणार्या पनवेलचे गेल्या पंधरा वर्षांपासून आमदार प्रशांत ठाकूर नेतृत्व करत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत त्यांनी विजयाचा चौकार साजरा केला आहे. दरम्यान या मतदारसंघांमध्ये मूलभूत आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर शासनाच्या वेगवेगळ्या योजना राबवून निधी मिळवून देणे यासारखे संकल्प लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी केले आहेतच.
मात्र हे करत असताना निवडणुकीच्या अगोदर पनवेलकर जितके मतांचे लीड देतील तितके झाडे लावण्याचा पण आ. ठाकूर यांनी केला होता. ५० हजारांहून अधिक मताधिक्यांनी त्यांचा चौथ्यांदा विजय झाला. हा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी ते आणि भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे.
१४ जानेवारी रोजी मकर संक्रांतीचे औचित्य साधून खारघर जवळ पांडवकडा येथे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ५०० वृक्षांची लागवड करण्यात आला. यावेळी भाजपचे खारघर शहर अध्यक्ष प्रविण पाटील, माजी नगरसेवक हरेश केणी, अॅड.मनोज भुजबळ, अॅड.नरेश ठाकूर, भीमराव पोवार, शहर सरचिटणीस दिपक शिंदे, भूपेश चव्हाण, अॅड.चेतन जाधव, हेमंत माने यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.