दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार , वनमंत्री गणेश नाईक यांना विश्वास

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला

By Raigad Times    16-Jan-2025
Total Views |
alibag
 
अलिबाग | दि. बा. पाटील एक दिशादर्शक व्यक्तिमत्व होते. त्यांचे कार्य फार मोठे होते अशी भावना वनमंत्री गणेश नाईक यांनी दि. बा. पाटील यांच्या जयंतीनिमित्त वाशी येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव लागणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सोमवारी (१३ जानेवारी) दि. बा. पाटील यांच्या ९९ जयंती निमित्त वाशीतील छ. शिवाजी महाराज चौकात नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
 
‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बां.चे नाव लागणार हा मला विश्वास आहे. कारण नामकरण चळवळ ही सर्वांनीच जिद्दीने मनावर घेतली आहे, लवकरच याबाबतीत राज्य आणि केंद्र स्तरावर शासकीय सोपस्कार पार पडून येत्या काही महिन्यांतच जनभावनेचा आदर करून निर्णय होईल,’ असे नाईक म्हणाले. दशरथ भगत म्हणाले की, दि. बा. पाटील यांनी संघर्ष करून पिडीतांना न्याय मिळवून दिला.
 
दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखालील संघर्षातून साडेबारा टक्के योजना लागू झाली. त्यांच्या प्रति कृतज्ञता म्हणून नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे. यावेळी गणेश नाईक, संदीप नाईक, आयोजन दशरथ भगत आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी दि. बा. पाटील यांच्या संघर्षमय, प्रेरणादायी जीवनाचे चित्रप्रदर्शन, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, जेष्ठ नागरिक, कचरावेचक भगिनी, कर्तव्यदक्ष महिला रिक्षा चालक भगिनी व अन्य उल्लेखनीय सामाजिक योगदान देणार्‍या व्यक्तींचा सन्मान,पाणपोई लोकार्पण असे विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले.