उरण | तालुक्यातील चिरनेरच्या शेतजमिनीत पिकविलेला वाल हा चविष्ट असल्याने त्याला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सेंद्रीय खत आणि नैसर्गिक पद्धतीने पिकणार्या या चवदार गोडव्याच्या वालांना भौगोलिक मानांकन मिळावे अशी मागणी चिरनेरच्या शेतकर्यांनी केली असून, कृषी विभागामार्फत तशा प्रकारचा प्रस्तावही देण्यात आला आहे. मात्र चार वर्षे उलटली तरी या प्रस्तावाची दखल घेतली गेली नसल्याने येथील शेतकर्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
चिरनेर गावातील वालाचे वाण हे पारंपारिक असून, येथील शेतकर्यांनी या पिकाचे आजपर्यंत जतन केले आहे. श्री महागणपती सेंद्रिय शेती गटाने, तर कृषी विभागाचे मार्गदर्शन घेऊन सेंद्रीय खतांचा मोठ्या प्रमाणात वापर करत हे पिक जपले आहे. खरीप हंगामातील भातपिक घेतल्यानंतर येथील शेतकरी रब्बी हंगामात हे वालाचे पीक घेतात. थंडीच्या दिवसात पडणार्या दवबिंदूवर हे वालाचे पिक बहरले जाते. या वालाच्या कडधान्य पिकाची नांगरणी करुन किंवा टोचणकरुन पेरणी केली जाते.
सुरुवातीला वालाच्या पिकाला ओलावा लागतो. त्यानंतर जसजसा जमिनीचा ओलावा सुकत जातो. तसतसे हे वालाचे पीक जोमाने बहरत जाते. पावसाळी दरवर्षी येथील शेतकरी शेतात शेणखतांचा गोवर, पालापाचोळा टाकत असतात. तो कुजून जातो आणि त्यापासून खरीप हंगामातील भात पिकाला आणि रब्बी हंगामातील वाल चवळीच्या पिकाला नैसर्गिक खत मिळते. विशेष करुन चिरनेर गावातील जी जमीन आहे.
त्या जमिनीच्या मातीत नैसर्गिक चविष्ट असे गुणधर्म आहेत. ही जमीन कसदार आणि ओलावा टिकवून धरणारी, चिकट जमीन आहे. जमीन चिकट असल्यामुळे पावसाळी नांगरणी करताना नांगराला लोंढा बसतो. त्यामुळे या जमिनीची नांगरणी करणेही जिकरीचे असते. या जमिनीला खांबारी वाल पिकणारी जमीन असे म्हणतात. या जमिनीत पिकणार्या आंबा, जांभूळ आणि येथील भात पिकाच्या तांदळालाही विशिष्ट प्रकारची चव आहे.
त्यामुळे चिरनेर गावातील वालांना पूर्वीपासूनच वाढती मागणी असून, शहरी भागातील नागरिक थेट चिरनेर गावात येऊन, अडीचशे ते तीनशे रुपये प्रति किलो दराने वाल खरेदी करत आहेत. हापूस आंब्यांनाही मोठी मागणी आहे. चिरनेर गावात श्री महागणपती सेंद्रीय शेती गटाची कृषी विभागामार्फत निर्मिती करण्यात आली असून, दर गुरुवारी येथील शेतकर्यांची शेती शाळा भरते.
नैसर्गिक चविष्ट गुणधर्म असणार्या या उच्च प्रतीच्या वालांना भौगोलिक मानांकन मिळविण्यासाठी श्री महागणपती सेंद्रीय शेती गटाचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, चार वर्षांपूर्वी दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडे यासंबंधीचा प्रस्ताव उरणच्या कृषी विभागाकडून पाठवण्यात आला आहे. त्यानंतर त्याचा वारंवार पाठपुरावाही करण्यात आला आहे. मात्र या प्रस्तावाकडे कृषी विभागाच्या अधिकार्यांकडून दुर्लक्ष होत असल्याची माहिती चिरनेरचे कृषीमित्र प्रफुल्ल खारपाटील यांनी दिली.
चिरनेर गावातील वालाचे वाण पारंपारिक आहे. येथील जमिनीत नैसर्गिक असे चविष्ट गुणधर्म आहेत. एकेकाळी येथील शेतकरी हा वालाचे पीक हे पाच ते दहा मण पिकवत होता. त्यावेळी प्रत्येक शेतकर्याच्या घरात गुरे होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेण खताचा वापर, तसेच गावाला भौगोलिक वारसा असल्यामुळे डोंगरदर्यांच्या नैसर्गिक नाल्यातून येणारा पालापाचोळा शेतात कुजत असे. याशिवाय जंगली वानरांचा आणि मोकाट गुरांचा कोणत्याही प्रकारचा त्रास नव्हता. त्यामुळे दवबिंदूवर पिकणारे बिनमेहनतीचे वालाचे पीक हे जोरदार येत असे. - शशांक मारुती ठाकूर, चिरनेर शेतकरी
भौगोलिक मानांकनासाठी कृषी विद्यापीठाकडून पिकाची तपासणी करून संशोधनाअंती त्याचा अहवाल तयार केला जातो. त्यानंतर भौगोलिक मानांकनाची प्रक्रिया पूर्ण केली जाते. मात्र अर्ज करूनही कृषी विद्यापीठाकडून दखल घेतली नाही. चिरनेरच्या प्रसिद्ध वालाला भौगोलिक मानांकन मिळावेयासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र त्याबद्दलची माहिती घेऊन सांगतो. - अर्चना सूळ, तालुका कृषी अधिकारी, उरण