...त्या फेरारी चालकाविरोधात रेवदंडा पोलिसांची कारवाई

By Raigad Times    02-Jan-2025
Total Views |
 alibag
 
अलिबाग | रेवदंडा येथील समुद्र किनार्‍यावर वाळूत रुतलेल्या फेरारीला बैलगाडीच्या साह्याने बाहेर काढल्याची घटना सोमवारी समोर आली होती. याबाबाचे वृत्त ‘रायगड टाइम्स’ने ठळकपणे दिले होते. या प्रकरणाची दखल घेऊन रायगड पोलिसांनी आता फेरारी चालकाविरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
 
समुद्रकिनार्‍यावर बेदरकारपणे वाहन चालवून पर्यटकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेरारी कंपनीची कॅलिफोर्निया कार वाहनचालकाच्या अतिउत्साहामुळे रेवदंडा समुद्र किनार्‍यावर वाळूत रुतली. वाळूत रुतलेल्या फेरारीला स्थानिकांनी बैलगाडीच्या मदतीने अलगद बाहेर काढले.
 
या घटनेची चित्रफीत समाज माध्यमांवर व्हायरल झाली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी फेरारी चालकाचा शोध सुरू केला. समुद्र किनार्‍यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर फेरारी चालक बेदरकारपणे समुद्रकिनार्‍यावर गाडी चालवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यावेळी तिथे असलेल्या पर्यटकांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता होती. पोलिसांनी सीसीटीव्ह फुटेजच्या आधारे गाडी नंबरचा शोध घेऊन वाहन चालकाचा शोध घेतला.
 
तेव्हा ही फेरारीगाडी संभाजी नगर येथील अभिषेक जुगलकिशोर तापडीया यांच्या नावावर असल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर पोलिसांनी वाहन चालकाविरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहीता, मोटर वाहन कायद्यातीलकलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा. पोलीस निरीक्षकश्रीकांत किरवले या प्रकरणाचा तपास करत आहेत. पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद लुटतांना इतरांचे जीव धोक्यात येतील असे कृत्य करू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या प्रकरणानंतर केले आहे.