पनवेल | खारघर पोलिसांच्या कस्टडीतून एक आरोपी फरार झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त संजय येनपुरे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
नवी मुंबई पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या आदेशानुसार नवी मुंबई हद्दीत बेकायदा राहणार्या विदेशी नागरीकाविरोधात विशेष कोंबिग ऑपरेशन राबवून जवळपास १६ आफ्रिकन नागरिकांना खारघर, तळोजा आणि उलवे परिसरातून ताब्यात घेतले होते. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत.
असाच एक गुन्हा खारघर पोलीस हद्दीत दाखल करण्यात आला होता. त्यानुसार विदेशी नागरिकांना बेकायदा आसरा देणार्या मालकावर देखील कारवाई सुरू करण्यात आली होती, या प्रकरणी खारघर पोलिसांना पाहिजे असलेला संशयित घरमालक केशव कडू याला पोलिसांनी ताब्यात घेवूनपुढील कारवाई सुरू केली होती.
अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे व पोलीस निरीक्षक निलेश धुमाळ यांनी पुढील कारवाईसाठी संशयित केशव कडू याला खारघर पोलिसांच्या ताब्यात दिले होते. केशव कडू याला खारघर पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर, संशयित केशव कडू याच्यावर अटकेची कारवाई सुरू झाली. याचवेळी, संशयित आरोपी कडू याने पोलिसांना चकवा देत पोलिस ठाण्यातून धूम ठोकत फरार झाला.
या घटनेमुळे पोलीस खात्यात खळबळ माजली होती. या प्रकरणानंतर संशयित आरोपी विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. ज्या पोलीस अधिकार्याच्या ताब्यातून संशयित आरोपी फरारा झाला त्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव यांची खातेअंतर्गत चौकशी सुरू झाली आणि अखेर या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव यांना दोषी ठरवत कर्तव्यात बेजबाबदारपणा व निष्काळजीपणा केल्या प्रकरणी वरिष्ठांच्या आदेशानुसार जाधव यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.