अलिबाग | पर्यटन वाढीसाठी रायगडच्या प्रमुख तीन समुद्र किनार्यांवर ‘रायगड टाइम्स’ने सुरु केलेल्या ‘बीच शो’चे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी भरभरुन कौतुक केले. जिल्ह्यातील पर्यटनवाढीसाठी असे उपक्रम आवश्यक असून यातून नवनवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतात, असेही त्यांनी यावेळी म्हटले. थर्टी फर्स्टच्या रात्री अलिबाग किनार्यावर ‘रायगड टाइम्स’ने अलिबाग ‘बीच शो’च्या विशेष आयोजन केले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ‘रायगड टाइम्स’चे संपादक राजन वेलकर, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, भाजपचे जिल्हा सरचिटणीस अॅड. महेश मोहिते, राष्ट्रवादीचे नेते हर्षल पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते दामले, आरसीएफचे महा व्यवस्थापक श्री.हरळीकर उपस्थित होते. स्थानिक कलाकारांना संधी मिळावी, येणार्या पर्यटकांना येथील संस्कृती कळावी आणि येणार्या पर्यटकाला येथून जाताना सोबत चांगल्या आठवणी घेऊन जाता याव्यात, यासाठी अलिबाग बीच शो सुरु करण्यात आला.
त्याचा विस्तार होत, अलिबागसह मुरुड, श्रीवर्धन येथेही बीच शो सुरु झाला आहे. पुढील वर्षी ‘बीच शो’ला अभिनेते शाहरुख खान यांना घेऊन येईन, असा शब्द त्यांनी उपस्थित अलिबागकरांना त्यांनी दिला. अलिबाग आज वाढते आहे. त्यामुळे येत्या नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर नगरपालिकेचे विस्तारीकरण नक्की होणार, अशी माहिती अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी दिली.
पर्यटन विभागाच्या माध्यमातून विशेष बाब म्हणून निधी मंजूर करुन आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आ.दळवी यांनी दिली. सर्वपक्षीय, पत्रकारांना सोबत घेऊन, नागरिकांच्या सूचनांचा विचारात घेऊन, पक्षविरहीत काम करुन, अलिबागचा विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचा शब्द त्यांनी दिला. काँगे्रसचे नेते अॅड. प्रविण ठाकूर यांनी ‘बीच शो’मुळे अलिबागचे नाव होत असल्याचे सांगत, या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
भाजपचे नेते अॅड.महेश मोहिते म्हणाले की, आज अलिबागचे नाव इतक्या मोठ्या प्रमाणावर घेतले जात आहे की, जगभरातील दिग्गज सेलिब्रिटींना येथे रहावेसे वाटत आहे. अभिनेते शाहरुख खान, क्रिकेटर रोहित शर्मा यांच्यासह अनेक दिग्गज आज अलिबागमध्ये रहायला आले आहेत.
त्यामुळे अलिबाग हे पर्यटनाच्या दृष्टीने आता ब्रँड होत चालले आहे. रायगड जिल्ह्यातील पर्यटन वाढावे यासाठी गेल्या दोन वर्षांपासून ‘बीच शो’चे आयोजन केले जात आहे. यावर्षीपासून मुरुड, श्रीवर्धनलाही बीच शो सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे येणार्या पर्यटकांची सायंकाळ संगीतमय करुन त्यांचा आनंद द्विगुणित करण्याचे काम बीच शोच्या माध्यमातून सुरु असल्याबद्दल अॅड.मोहिते यांनी समाधान व्यक्त केले.