काशीद समुद्रात बुडून पर्यटकाचा मृत्यू , आठवड्यातील दुसरी घटना | पर्यटकांची सुरक्षा ऐरणीवर

By Raigad Times    02-Jan-2025
Total Views |
 Murud
 
मुरुड जंजिरा | मुरुड व काशीद समुद्र किनारी थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी आलेल्या पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला. प्रतिक सहस्रबुद्धे असे या पर्यटकाचे नाव आहे. आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. विशेष म्हणजे हा पर्यटकदेखील पुणे येथून मुरुडला आला होता. काशिद समुद्रकिनारी विविध जिल्ह्यातून राज्यातून पर्यटक आले होते.
 
यामधील जैनवाडी जनता वसाहत साईबाबा मंदिराजवळ पुणे येथील पर्यटक प्रतिक सहस्रबुद्धे हे आपल्या मित्रांबरोबर याठिकाणी आले होते. मंगळवारी दुपारी ३ वाजून ३० मिनिटांच्या दरम्यान प्रतिक प्रकाश सहस्रबुद्धे (वय ३१) हा समुद्राच्या पाण्यात पोहण्यास गेला असता त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. ही आठवड्यातील दुसरी घटना असल्याने पुन्हा पर्यटकांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
 
पुणे येथून थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी भाडोत्री रिक्षा घेऊन प्रतिक प्रकाश सहस्रबुद्धे, गणेश नितीन सहस्रबुद्धे, रिक्षाचालक शदाब अविद मलिक, राकेश राजू पवार हे चौघे मित्र फिरण्यास आले होते. दुपारच्या दरम्यान चौघेही समुद्राच्या पाण्यात पोहण्यास उतरले होते.
 
पोहुन झाल्यानंतर स्पोर्ट बाईकवर फिरु असा बेत ठरला. त्याकरिता आपल्या गाडीतून पैसे आणण्याकरिता बाहेर आले आणि प्रतिक सहस्रबुद्धे हा पाण्यात पोहत राहिला.तिघांना वाटले की प्रतिकही पाण्यातून बाहेर आला असेल आणि कुठे तरी फिरत असेल. दीड तासानंतर प्रतिक सहस्रबुद्धे हा पाण्यात तरंगताना लाईफ गार्ड यांना दिसला. ताबडतोब घटनास्थळी असलेले पोलीस व लाईफ गार्ड समुद्राच्या पाण्यात उतरले आणि प्रतिक सहस्रबुद्धे यांना बाहेर काढण्यात आले.
 
परंतु प्रतिक हा प्रतिसाद देत नसल्याने त्यास पोलिसांनी ताबडतोब मुरुड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. परंतु त्याचा आधीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टर यांनी सांगितले. ही माहिती मिळताच मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख व पोलीस हवालदार हरि मेंगाळ घटनास्थळी दाखल झाले. यासंदर्भात मुरुड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार हरि मेंगाळ करीत आहेत. या घटनेमुळे प्रतिकच्या मित्रपरिवारावर दुःखाचा कोसळला.