ऑनलाईन दाखल्यांची जास्त फी घेणार्‍या केंद्रांवर कारवाई होणार

By Raigad Times    21-Jan-2025
Total Views |
 alibag
 
लोणेरे | आपलं सरकार सेवा केंद्र,सी एस सी महा-ई-सेवा केंद्र या केंद्रांकडून नागरिकांना विविध प्रकारचे दाखले यामध्ये जात प्रमाणपत्र, नॉनक्रिमिलेयर प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र,वय अधिवास प्रमाणपत्र, ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र, जेष्ठ नागरिक प्रमाणपत्र आदी प्रमाणपत्र ऑनलाईन निर्गमित करण्यात येतात.
 
तालुयातील अश्या ऑनलाईन केंद्रावर शासन नियमावली पेक्षावाढीव फी हे ऑनलाईन केंद्र चालक घेत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर भाजपचे माणगांव तालुका अध्यक्ष गोविंद कासार, जिल्हा कार्यकारिणी सदस्य चिन्मय मोने, तालुका सरचिटणीस बाबुराव चव्हाण, तालुका उपाध्यक्ष राजू मुंडे, इंदापूर विभाग अध्यक्ष निखिल साळुंखे यांनी सदर बाब माणगांव तहसीलदार यांच्या निदर्शनास आणून दिली व तशा प्रकारचे निवेदन देऊन त्याचा पाठपुरावा केला आणि त्यांच्या प्रयत्नांना प्रतिथयश आले आहे.
 
६ जानेवारी रोजी माणगांव तहसीलदार यांनी सर्व ऑनलाईन केंद्र चालकांना पत्र निर्गमित केले आहे यामध्ये ऑनलाईन प्रणालीद्वारे नागरिकांना देण्यात येणार्‍या दाखल्याची फी आकारताना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ नेमून दिलेली फी आकारण्यात यावी. त्याप्रमाणे शासकीय पावती तात्काळ देण्यात यावी, त्या व्यतिरिक्त फी आकारताना निदर्शनास आल्यास संबंधित केंद्रावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे. माणगांव तालुका भाजप पदाधिकार्‍यांनी नागरिकांच्या सेवेच्या उचललेल्या या पावलाचे तालुयातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.