आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल; पण तटकरे कुटुंबाला स्वीकारणार नाही-आ.महेंद्र थोरवे

By Raigad Times    21-Jan-2025
Total Views |
 khopoli
 
खोपोली | विधानसभा निवडणुकीत महायुतीत राहून शिवसेनेचा विश्वासघात करणार्‍या सुनील तटकरे यांच्याच घरात रायगडचे पालकमंत्री देणार असाल तर आम्ही ते स्वीकारणार नाही, मग आमचा राजकीय अस्त झाला तरी परवा नाही, अशी भूमिका कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी घेतली आहे. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिल्यानंतर शिंदे गट शिवसेनेचे आ.भरत गोगावले, महेंद्र दळवी यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
 
आ.महेंद्र थोरवे यांनी सोमवारी (२० जानेवारी) प्रसारमाध्यमांशी बोलताना संवाद साधला. यावेळी सरकारने पालकमंत्री पदाला स्थगिती दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उठाव केला. यामध्ये रायगडमधील आमदारांचे मोठे योगदान आहे.
 
राज्यात सत्तांतर झाले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, त्यावेळी भरत गोगावले मंत्री व्हायला हवे होते, अशी इच्छा सर्वांची होती; परंतु पक्षसंघटना बळकट करण्यासाठी गोगावलेंनी मंत्रिपदाचा त्याग केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात भरत गोगावले मंत्री आहेत. तेच या जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावेत, अशी सर्व आमदारांची इच्छा होती. यासंबंधीची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली होती.
 
त्यामुळे आम्हाला भरतशेठ पालकमंत्री होतील याची खात्री होती. परंतू जर महायुतीत राहून विश्वासघात करणार्‍या तटकरे यांच्याच घरात पालकमंत्रीपद देणार असाल तर आम्ही विरोध करणारच, असेही त्यांनी बोलून दाखवले आहे. एकवेळ पालकमंत्रीपद भाजपला दिले तरी चालेल; परंतु महायुतीत राहून विश्वासघात होणार असेल तर आम्ही सहन करणार नाही, असा इशारा आ.महेंद्र थोरवे यांनी दिला आहे.