अलिबाग | राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्या कन्या राज्याच्या मंत्री अदिती तटकरे यांचे पालकमंत्रीपद स्थगित करण्यात आले आहे. शिवसेना शिंदे गटाच्या दबावानंतर अवघ्या २४ तासांत, तेही रविवारी सरकारने हा निर्णय घेतला. यानंतर रायगडात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये सन्नाटा पसरला आहे. तर कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादीचा पालकमंत्री होऊ देणार नाही, अशी भूमिका शिवसेनेच्या आमदारांनी घेतली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचे सरकार स्थापन केल्यानंतर मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी एका महिन्यापेक्षा जास्त काळ उलटला होता. त्यानंतर महायुतीतील मित्रपक्षांमध्ये पालकमंत्रीपदावरुन वाद दिसून आला. दीर्घकाळ रखडलेल्या पालकमंत्र्यांची नावे १८ जानेवारी रोजी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली. या नव्या पालकमंत्र्यांच्या यादीत अनेकांना सहपालकमंत्रीपदही मिळाले. तर काही जिल्ह्यांमध्ये मात्र मंत्र्यांना संधी देण्यात आली नाही.
शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे आणि भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळाले नाही. याउलट पालकमंत्रीपद अदिती तटकरे यांना मिळाल्यानंतर रायगडात शिवसेना आमदारांसह कार्यकर्त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. रायगडात शिवसेनेचे तीन आमदार असल्याने पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळावे, अशी भूमिका सुरुवातीपासूनच शिवसेना आमदारांची राहिली आहे. २०२२ मध्ये उध्दव ठाकरे सरकारमधून बाहेर पडताना हाच विषय या आमदारांनी पुढे केला होता.
एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात भरत गोगावले यांना मंत्रीपद मिळाले नाही; मात्र पालकमंत्रीपद शिवसेनेकडे ठेवण्यात यश आले. २०२४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांचे सरकार राज्यात आल्यानंतर रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पुन्हा चढाओढ पहायला मिळाली. शेवटी राज्याच्या मंत्री अदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद देण्यात आले. अदिती तटकरे यांचे नाव जाहीर होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला तर शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.
रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद जोरदार पेटला असताना, राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने रायगडच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे. अवघ्या २४ तासांत अदिती तटकरे यांना दिलेले पालकमंत्रीपद स्थगित करण्यात आले. एकंदरीत, पालकमंत्रीपदाच्या या वादावर तूर्तास पडदा पडला असला तरी रायगडचे पालकमंत्रीपद कोणाला मिळणार? भरतशेठ, अदिती तटकरे, दोघांना विभागून की पुन्हा एकदा जिल्ह्याबाहेरच्या मंत्र्याकडे रायगडचे पालकत्व सोपवले जाते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसवरुन परतल्यानंतर याबाबत अंतिम निर्णय होईल, असे बोलले जात आहे.
झेंडावंदन अदिती तटकरेच करणार
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाच्या निर्णयाला राज्य सरकारने स्थगिती दिली असली तरी २६ जानेवारीला रायगडमधून अदिती तटकरे झेंडावंदन करणार आहेत.
शासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयानुसार भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनी (दि. २६ जानेवारी रोजी) नाशिक येथे मंत्री गिरीष महाजन व रायगड येथे अदिती तटकरे या राष्ट्रध्वजारोहण करतील, असे नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे आता रायगडमधून अदिती तटकरे आणि नाशिकमधून गिरीष महाजन हेच प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करणार, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.