अलिबाग | उरण तालुक्यातील चिरनेर परिसरात घरगुती कुक्कुटपालनातील पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूची लागण झाली आहे. त्यामुळे चिरनेरच्या १ किलोमीटर परीघातील क्षेत्र बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. दरम्यान बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने कंबर कसली आहे.
चिरनेरमधील १ हजार १८ कोंबडया, १६६ अंडी, २७० किलो खाद्य, ५० किलो भाताचा तूस, १० रिकाम्या पिशव्या आदिंची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे. चिरनेर येथील परसदारातील कुकुट पक्ष्यांमध्ये मरतूक आढळल्याने रोग निदानासाठी नमुने भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशु रोग प्रयोगशाळा, भोपाळ मध्य प्रदेश येथे रोग निदानास्तव पाठविण्यात आले होते.
या प्रयोगशाळेने कुक्कुट पक्षातील मरतूक एव्हियन इन्फ्लुएंझा, बर्ड फ्लू या रोगाने झाल्याचा अहवाल दिला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी बाधित क्षेत्रापासून एक किलोमीटरपर्यंतचा परिसर बाधित क्षेत्र व १ ते १० किमीचा परिसर सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित केला आहे.
मानव संक्रमित आजार
हा आजार मानवात संक्रमित होऊ शकणारा असल्याने प्रतिबंधात्मक उपाय योजना तातडीने सुरू करण्यात आली. राज्य सरकार व जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग कामाला लागला. स्थानिकांना विश्वासात घेऊन घरगुती कोंबड्या नष्ट करण्याची मोहीम रविवार आणि सोमवारी राबविण्यात आली.
यासाठी महसूल, पोलीस, परिवहन तसेच वनविभागाची मदत घेण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून बाधित क्षेत्रातून मृत व जीवंत पक्षी, खाद्य, मांस, विष्ठा, उपकरणे इत्यादींची वाहतूक करण्यास ९ फेब्रुवारी २०२५ पर्यंत मनाई करण्यात आली आहे. चिरनेर परीसरातील चिकनची ५ दुकाने ९ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक सहआयुक्त डॉ. प्रशांत कांबळे, रायगड जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सचिन देशपांडे, जिल्हा परिषदेचे पशूसंवर्धन अधिकारी डॉ. श्यामराव कदम यांनी प्रत्यक्ष या मोहीमेत सहभाग घेऊन मार्गदर्शन केले.
पशुसंवर्धन, आरोग्य, महसूल, ग्रामविकास, पोलीस, वनविभाग,परिवहन इत्यादी विभागांच्या समन्वयाने बाधित क्षेत्रात कृती आराखड्याप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे. ज्या नागरीकांचे यामध्ये नुकसान झाले आहे त्यांना भरपाईची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाईल. रोगस्थिती नियंत्रणात असून कुकुट व्यवसायिक व नागरिकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगावी. प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. - डॉ. किशन जावळे, जिल्हाधिकारी-रायगड