दिघी औद्योगिक क्षेत्रासाठी १८०० कोटी मंजूर , निविदा प्रक्रिया पूर्ण; लवकरच होणार कामाला सुरुवात

१ लाख रोजगाराच्या संधी; खा.सुनील तटकरेंची माहिती

By Raigad Times    22-Jan-2025
Total Views |
alibag
 
अलिबाग | रायगडातील दिघी औद्योगिक वसाहतीसाठी १८०० कोटी रुपये मंजूर झाले असून, निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. पुढील महिन्यात कामाला सुरुवात होणार आहे. याठिकाणी मोठे प्रकल्प येणार असून, त्या माध्यमातून प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष १ लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती खा. सुनील तटकरे यांनी दिली.
 
अलिबाग शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात मंगळवारी (२२ जानेवारी) खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. मुंबई दिल्ली कॉरीडॉरमधील दिघी औद्योगिक वसाहत हा महत्त्वाचा टप्पा आहे. याठिकाणी तीन मोठे औद्योगिक प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यामध्ये लेदर प्रकल्प, बल्क फार्मा या प्रकल्पांचा समावेश असून, यामाध्यमातून प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष १ लाख रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.
 
यावेळी मुंबई गोवा महामार्गाची दुराबस्थेबाबत पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देताना सुनील तटकरे यांनी महामार्गाची दुरवस्था झाली नसून, केवळ काही ठिकाणी काम अपूर्ण राहिले आहे, असे वक्तव्य केले. संजय राऊत रायगड जिल्ह्यातील औद्योगिक कंपनीमधून खंडणी आणि तोडपाणी मिळवण्यासाठी पालकमंत्री बनण्याची धडपड सुरू आहे. त्यांना नेमके कोणाला बोलायचं आहे? याचे उत्तर तेच देऊ शकतात, असेही तटकरे म्हणाले.
 
राष्ट्रवादीला महायुतीत रायगड जिल्ह्यात एकाकी पाडले जात आहे का? या प्रश्नावर बोलताना तटकरे म्हणाले की, भाजपचे नेते आणि विधानसभा सदस्य आम्हाला एकाकी टाकत नाहीत. मात्र बाकीचे याबाबत काय विचार करतात? किंवा त्यांच्या मनात काय आहे, हे काळाच्या ओघात जाईल निघुन. संघर्षाला तोंड देत मी इथपर्यंत पोहचलो माझ्यासाठी हे नवीन नाही. मात्र माझावर काही आरोप निराधार पद्धतीचे कऱण्यात आले; त्यांचे पुढे काय झाले? ते सर्वांनी पाहिले आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
 
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणातील पळस्पे ते इंदापूर दरम्यान सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ठिकाणी काम रखडले आहे. तर इंदापूर ते रत्नागिरीपर्यंत ८५टक्के काम पूर्ण झाले आहे. माणगाव बायपासचे काम रखडले आहे. लवकरच महामार्गाचे काम पूर्ण होईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार अनिकेत तटकरे, राष्ट्रवादीचे अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अमित नाईक, चारुहास मगर, ऋषिकांत भगत यांच्यासह राष्ट्रवादीचे अलिबाग तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री पदाच्या वादावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसून निर्णय घेणार
रायगड पालकमंत्रीच्या वादावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसून निर्णय घेणार आहे. मुख्यमंत्री सध्या दाओसला गेले आहेत. तिकडे परकीय गुंतवणूक आणण्यात ते यशस्वी होतील.
 
त्यामुळे राज्यात काही वाद निर्माण करणे उचित राहणार नाही. मुख्यमंत्री आल्यावर त्यांच्यासोबत दोन्ही उपमुख्यमंत्री बसणार आणि निर्णय घेणार असे खा. सुनील तटकरे म्हणाले. युती, आघाडीच्या सरकारमध्ये सर्वच गोष्टी सर्वांना मिळत नाहीत. तडजोडी कराव्यात लागतात, असेही त्यांनी सांगितले. बावनकुळे भाजपचे अध्यक्ष आहेत.
 
त्यांनी काल सांगितले की, आम्ही सुसंस्कृत आहोत. आघाडी युतीच्या राजकारणामध्ये सर्वांच्या मनासारखे होईल असे नाही. राज्यात २३७ आमदारांचे पाठबळ आहे. राज्याच्या विकासाला गती देण्याची उत्तम संधी जनतेने दिली आहे. रायगड, कोकण असेल केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विकासाची संधी प्राप्त झाली, असेंदेखील ते म्हणाले.