शिवसेना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाक्युध्द , रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन वाद टोकाला

By Raigad Times    23-Jan-2025
Total Views |
 alibag
 
अलिबाग | रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वाद पेटला आहे. पालकमंत्रीपदाला स्थगिती दिल्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धन्यवाद दिले. तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही भरत गोगावले वैफल्यग्रस्त झाल्याची टिका केली आहे. एकंदरीत जिल्ह्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाक्युध्द रंगले आहे.
 
कॅबीनेट मंत्री भरत गोगावले यांच्यासाठी शिवसेना आमदार जोरदार लॉबिंग करत असताना, रायगडचे पालकमंत्रीपद अदिती तटकरे यांना देण्यात आले. यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे सर्वांनी पाहिले. रस्ता रोखून धरला. या वादावादीनंतर अदिती तटकरे यांचे पालकमंत्रीपद स्थगित करण्यात आले.
 
यानंतरही हा वाद येथे संपला नाही. रायगडचे पालकमंत्रीपद मंत्री भरत गोगावले यांना मिळावे, अशी मागणी शिवसेना कार्यकर्त्यांनी केली. महत्त्वाचे म्हणजे पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गोगावले यांची पाठराखण करताना, गोगावले हे अनुभवी आहेत, बरीच वर्षे ते जिल्ह्यात काम करत आहेत, त्यामुळे त्यांनी जर एखाद्या पदासाठी इच्छा व्यक्त केली असेल तर गैर काय? असा प्रतिप्रश्न पत्रकारांसमोर उपस्थित केला होता.
 
alibag
 
अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनीही आपला तीव्र विरोध दर्शविला आहे. यानंतर जिल्हाप्रमुख राजा केणी, प्रमोद घोसाळकर यांच्यासोबत जिल्ह्यातील सर्वच शिवसैनिकांनी तटकरे नकोच...अशी भूमिका घेतली आहे. यानंतर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे हेदेखील आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. ते या विषयावर थेट बोलत नसले तरी मनात आग धुमसत आहे.
 
मंगळवारी अलिबाग येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही खदखद अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवली., आयुष्यभर अशाच संघर्षाला तोंड देत मी काम करत आलो. मात्र राजकीय फायद्यासाठी गेल्या २० वर्षांत माझ्यावर ज्यांनी ज्यांनी निराधार आरोप केले, त्यांचे पुढे राजकारणात काय झाले ते सर्वांनी पाहिले आहे, असा सूचक इशाराच तटकरे यांनी शिवसेना आमदारांना दिला आहे.
 
यानंतर राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे यांनी शिवसेनेची अक्षरशः लायकी काढली आहे. मंत्री गोगावले व शिवसेना पदाधिकार्‍यांची वक्तव्ये वैफल्यग्रस्त भावनेतून असल्याची टिका केकाणे यांनी बुधवारी (२२ जानेवारी) झालेल्या पत्रकार परिषदेत केली. राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका करणार्‍यांनी, आधी आपली पात्रता ओळखावी, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
 
आम्ही विधानसभा निवडणुकीत महायुतीचा धर्म पाळून काम केले आहे. हे मतांच्या आकडेवारीतून दिसून आले आहे. पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल, असेही ते म्हणाले. यावेळी केकाणे यांनी शिवसेना नेत्यांवर तोंडसुख घेतले. एकंदरीत रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबतच दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या जोरदार वाक्युध्द सुरु असल्याचे पहायला मिळत आहे.