अलिबाग | सध्या स्पर्धेच्या काळात ऑनलाईन शिक्षणाला अधिक महत्त्व प्राप्त झाल्यामुळे इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर या संस्थेच्यावतीने मोफत टॅबचे वाटप करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी याचा गुणवत्ता वाढीसाठी उपयोग करावा असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृह येथे महाज्योती संस्थेच्यावतीने मोफत टॅब वाटप कार्यक्रमात जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी सहायक आयुक्त समाज कल्याण समाधान इंगळे उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते महाज्योतीमार्फत इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील २४ विद्यार्थ्यांना मोफत टॅबचे वाटप करण्यात आले.
महाज्योती योजनेअंतर्गत, विज्ञान शाखेच्या अंतर्गत प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांना MHT-CET/ JEE/NEET-2025 साठी मोफत कोचिंगसाठी मोफत टॅबलेटचे वाटप केले जाते. ज्याचा वापर करून आर्थिकदृष्ट्या मागासलेले विद्यार्थी त्यांच्या शिक्षणाचा आणि त्यांना मिळालेल्या या सुविधांचा उपयोग करून त्यांचे भविष्य सुधारू शकतात. महाज्योती संस्थेच्यावतीने गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत टॅब सोबत दररोज सहा जीबी इंटरनेट डेटाची सुविधा नीट परीक्षा होईपर्यंत साधारण दीड वर्षे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.