स्नेहल जगताप भाजपच्या वाटेवर ? शिवसेना ठाकरे गटाच्या महाड येथील नेत्या

रायगडात चर्चेला उधाण, ठाकरे गटाचा आणखी एक नेता करणार प्रवेश?

By Raigad Times    24-Jan-2025
Total Views |
alibag
 
अलिबाग | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाडमधील नेत्या स्नेहल जगताप लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांनी मात्र या चर्चेचा इन्कार केला आहे. स्नेहल यांच्यासोबतच शिवसेनेचा आणखी एक मोठा नेता ठाकरे सेनेला सोडचिट्ठी देऊन भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोसमध्ये आहेत. ते परतल्यावर जिल्ह्यात मोठा पक्षप्रवेश होईल, असे सांगितले जात आहे.
 
भाजपने ‘मिशन २०२९’ सुरु केले आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष खा. धैर्यशिल पाटील यांनी कोकणात मोर्चेबांधणी सुरु केली आहे. रायगडात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. आस्वाद पाटील यांच्या नेत्तृवाखाली शेकापची एक मोठी फळी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.
 
त्यांच्यासोबतच शिंदे गटाचा माजी नेता आणि ठाकरे गटाचा एक असे दोन मोठे नेते देखील यावेळी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहेत. यात आत स्नेहल जगताप यांच्या नावाचीही भर पडली आहे. महाडच्या माजी नगराध्यक्षा काँग्रेस नेत्या स्नेहल जगताप यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यांनी महाडमधून भरत गोगावले यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती.
 
त्यांना ९१ हजार २३२ मते मिळवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीत स्नेहल जगताप यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे स्नेहल जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाच तर २०२९ ची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्यासाठी महाडमध्ये भाजपला शिवसेनेच्या भरत गोगावले यांच्याविरोधात तगडे आव्हान निर्माण करता येईल, असेदेखील म्हटले जात आहे.
 
दरम्यान, ही सर्व चर्चा कार्यकर्त्यांच्या पातळीवरील आहे, माझी अशी कोणाशीही चर्चा झाली नाही, अशी भूमिका स्नेहल जगताप यांनी स्पष्ट केली यामुळे चर्चा असल्याप्रमाणे महाड-पोलादपूर मतदारसंघात खरंच ही राजकीय घडामोड घडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
स्नेहल जगताप यांची भूमिका काय? काँग्रेसचे दिवंगत माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या असलेल्या स्नेहल जगताप सुसंस्कृत नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्या महाडच्या नगराध्यक्ष असताना त्यांनी केलेली कामे आजही स्मरणात आहेत. आता त्या भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु झाल्याने त्या अस्वस्थ झाल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी अशी चर्चा सुरू झाली, हे सर्वात वाईट असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
माझी भाजपच्या कोणत्याही नेत्याशी ना चर्चा झाली ना बैठक झाली. त्यामुळे मी भाजपमध्ये जाणार ही चर्चा, अचानक कशी सुरू झाली? माहित नाही. मला मत देणार्‍या कार्यकर्त्यांची कामे व्हावीत यासाठी कार्यकर्ता पातळीवर भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरु आहेत. यात माझा काहीही संबंध नाही. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात आमची ‘मातोश्री’वर बैठक झाली. त्यामुळे भाजप प्रवेशाच्या बातम्या चुकीच्या असल्याचे स्नेहल जगताप यांनी सांगितले.