कर्जत | तालुयात काही महिन्यांपूर्वी डेंग्यूने दोघांचे बळी घेतले होते आणि त्यानंतर आता गावात टायफाईडने डोके वार काढले आहे. नेरळ गावात दूषित पाण्यामुळे टायफाईडचे रुग्ण आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर तालुका आरोग्य अधिकारी यांनी नेरळ गावात येऊन वस्तुस्थिती समजून घेतली.
दरम्यान, रुग्ण ज्या खासगी रुग्णालयात दाखल आहेत, तेथे आरोग्य खात्याचे कर्मचारी पाठवले असून जीवाणूसदृश्य ताप आढळून आल्यास प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. मध्य रेल्वेवरील नेरळ गावात दररोज मुंबईत येथून येणार्यांची संख्या हजारोच्या संख्येत आहे. त्यात मुबलक पाणी मिळत असल्याने नेरळ गावात राहण्याला प्राधान्य दिले जात आहे. मात्र तेच नेरळचे पाणी मागील काही वर्षे नेरळकरांचे जगणे कठीण करून बसले आहे.
नेरळ गावात मागील काही वर्षे ग्रामपंचायत प्रशासन यांच्याकडून पुरेसे लक्ष दिले जात नसल्याने कमी दाबाने पाणी पुरवठा, गढूळ पाणी, जलशुद्धीकरण प्रकल्पातील उणीवा आदी कारणे पुढे आली आहेत. या सर्व कारणांमुळे नेरळ गावात पाणी साठवून ठेवण्याची प्रथा पुढे आली आणि मागील वर्षी नेरळ गावात ५० हुन अधिक डेंग्यूचे रुग्ण आढळले होते. त्यातील दोन रुग्ण दगावले असून त्यावेळी आरोग्य यंत्रणा सतर्क होऊन काम करीत असल्याचे दिसून आले होते.
त्यानंतर आता दूषित पाण्यामुळे नेरळ गावात टायफाईडचे रुग्ण आढळत आहेत. नेरळ ग्रामपंचायतीचा एक माजी सदस्य देखील त्याचा शिकार बनला असून दहा पेक्षा अधिक रुग्णांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत. नेरळ गावातील टायफाईड झालेले रुग्ण बदलापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल होत असतात. ही परिस्थिती लक्षात घेऊन कर्जत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नितीन गुरव यांनी नेरळ गावात येऊन विविध खासगी डॉटर यांच्या गाठीभेटी घेतल्या.
त्याचवेळी डॉ.गुरव यांनी बदलापूर येथिल खासगी रुग्णालयात आपली नेरळ प्राथमिक केंद्रातील कर्मचारी यांना बदलापूर येथे पाठवून दिले. नेरळ ग्रामपंचायतीचे प्रशासक सुजित धनगर आणि ग्रामपंचायत अधिकारी अरुण कार्ले यांच्यासोबत चर्चा केली. त्यावेळी नेरळ ग्रामपंचायतीनेदेखील जलशुद्धीकरण केंद्रातून शुद्ध करण्यात आलेले पाणीच वितरीत केले जाईल, असे ओशासन देण्यात आले आहे.