मुंबई-गोवा महामार्गाचे काम वर्षभरात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट , रोहयो मंत्री भरत गोगावले यांची माहिती

By Raigad Times    25-Jan-2025
Total Views |
 alibag
 
अलिबाग | मुंबई-गोवा महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. वन विभागाच्या आडकाठीमुळे थोडी अडचण आहे. मात्र वर्षभरात महामार्गाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून यानंतर अपघाताचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी दिली.
 
रस्ता सुरक्षा सप्ताह २०२५ अंतर्गत रायगड जिल्हा पोलीस यांच्यावतीने जीवनदूत सन्मान सोहळा २०२५ चे आयोजन आर. सी. एफ. सभागृह कुरुळ येथे करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आ. महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपवनसंरक्षक राहुल पाटील, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते आदी उपस्थित होते.
 
महामार्गावर अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना शासनामार्फत सर्वतोपरी मदत तात्काळ उपलब्ध करुन देण्याचे निर्देश रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी दिल्या. तसेच नैसर्गिक, मानवनिर्मित कोणत्याही आपत्ती किंवा संकटाच्या वेळी मदतीसाठी सदैव तत्पर असणार्‍या जीवनदूत यांची सामाजिक बांधिलकी अतिशय कौतुकास्पद असून त्यांना शासनस्तरावरून पुरेसे सहकार्य देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
 
alibag
 
यावेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी किशन जावळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सामाजिक संस्था खोपोली, साई सहारा प्रतिष्ठान पेण, साळुंके रेस्क्यू टीम, माणगाव आणि महाड, रेस्क्यू टीम कोलाड, शिवदुर्ग मित्र लोणावळा रेस्क्यू टीम, शेलारमामा रेस्क्यू टीम माणगाव, युवा एकता जनकल्याण सामाजिक संस्था, एल अँड टी कन्ट्रक्शन महाड, बस चालक, रुग्णवाहिका चालक या जीवन दूतांचा सम्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले तर आभार अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांनी मानले.