अलिबाग | रायगडमधील पालकमंत्री पदावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आव्हान प्रतिआव्हानाची भाषा सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही प्रमाणिकपणे काम केले आहे. जर आमच्याकडून एखादी तरी चूक झाली असेल तर दाखवून द्या, मी मंत्रीपदाचा राजीनामा देतो, असे आव्हान मंत्री भरत गोगावले यांनी खासदार सुनील तटकरे यांना दिले आहे.
अलिबागच्या हेमनगर येथे रविवारी (२६ जानेवारी) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गोगावले यांनी आपल्या भाषणात सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला. आम्हाला आमच्या विजयात जेवढा आनंद झाला नाही त्यापेक्षा अधिक दुःख या माणसाने आमची फसवणूक केल्याने झाले.
ज्या माणसासाठी आम्ही तन-मन-धन अर्पून काम केले, रक्ताचे पाणी केले, सर्वस्व पणाला लावले आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची एकमेव जागा निवडून आणली. हे जर ते जर विसरत असतील तर त्यापेक्षा अधिक दुःख काय असू शकते? असा सवाल भरत गोगावले यांनी केला. आम्ही कुठल्याही मंदिरात यायला तयार आहोत. कर नाही त्याला डर कशाला, आम्ही छत्रपतींच्या भूमीतील मावळे आहोत. आम्ही हाकलल्यावर उडून जाणारे कावळे नाहीत, असेही गोगावले म्हणाले.
त्रास देणारे दुसरे कुटुंबही संपवणार-आ.दळवी
अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनीही सुनील तटकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली. लोकसभा निवडणुकीत रायगडच्या जागेसाठी भाजप आग्रही होता; परंतु सुनील तटकरे हे योग्य उमेदवार आहेत इतर कुणीही चालणार नाही, अशी भूमिका मी घेतली आणि ती सार्थ ठरवली भाजपच्या नेत्यांचा रोष ओढावून घेतला. आपण सर्वांनी त्यांना मोठ्या फरकाने त्यांना निवडून दिले.
परंतु त्यांनी आम्हाला फसवले. मला तर आतापर्यंत तीन वेळा फसवले. ज्यांनी त्यांचे प्रामाणिकपणे काम केले, त्यांना मोठे केले, त्या अंतुले साहेबांपासून कुणालाही त्यांनी जगू दिले नाही. उलट त्यांचे राजकीय करीअर बरबाद करण्याचे काम त्यांनी केले अशी टीका महेंद्र दळवी यांनी केली.
या जिल्ह्यातून आम्ही शेकाप, पाटील कुटुंब राजकीयदृष्ट्या संपवले आता आम्हाला त्रास देणारे दुसरे कुटुंबही संपवणार, असा इशारा दळवी यांनी सुनील तटकरे यांना दिला. दरम्यान, भरत गोगावले हे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत.
त्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा योग्य निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील असे स्पष्ट केले होते. मात्र, अद्याप रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार? यासंदर्भातील निर्णय झालेला नाही. त्यामुळे आता रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात? याकडे रायगडकरांचे लक्ष लागले आहे.
आ.महेंद्र थोरवे हेच ‘गद्दारांचे बादशाह’-अनिकेत तटकर
अलिबाग | नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत खासदार सुनीलतटकरे यांनी शिवसेनेच्या उमेदवारांसाठी काम केले नाही, रायगडमधील शिवसेनेच्या (शिंदे) तिन्ही विद्यमान आमदारांना पाडण्याचा प्रयत्न केला” असा आरोप रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी केला आहे.
"पालीच्या बल्लाळेश्वराच्या मंदिरात जाऊन शपथ घेण्यासही मी तयार आहे”, असेही ते म्हणाले. यावर प्रतिक्रीया देताना सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांनी शिंदे शिवसेनेच्या आमदारांवर जोरदार पलटवार केला आहे. "माझी देखील कोणत्याही मंदिरात जायची तयारी आहे.
पालीचा बल्लाळेश्वर, हरिहरेश्वर, अलिबागच्या कनकेश्वर मंदिरात जायची माझी तयारी आहे. कारण आम्ही विधानसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे महायुतीचे काम केले आहे. अलिबागमध्ये महेंद्र दळवींसाठी, महाडमध्ये भरत गोगावले यांच्यासाठी काम केले आहे. कारण लोकसभा निवडणुकीत या मंडळींनी प्रामाणिक काम केले होते. तसेच आम्ही विधानसभेला काम केले.
आम्ही आमची पूर्ण ताकद लावली होती”, असे अनिकेत तटकरे म्हणाले. दरम्यान, आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांचा बेईमानांचा बादशाह असा उल्लेख केला होता. त्यावरही अनिकेत तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "खरंतर आमदार थोरवे यांचे अशा प्रकारचे बोलणे खूपच हास्यास्पद आहे.
कारण तेच गद्दारांचे बादशाह आहेत, असे मी छातीठोकपणे सांगू शकतो. थोरवे यांचे स्वीय सहाय्यक निवडणुकीच्या वेळी श्रीवर्धनमध्ये काय करत होते, कशा प्रकारे शिवसैनिकांना चिथावणी देत होते, जे शिवसैनिक महायुतीचे काम करत होते त्यांना काय सांगत होते ते सगळे आम्ही बाहेर काढू. थोरवे यांनी निवडणुकीच्या काळात महायुतीला छेद देण्याचे काम केले. झाकली मूठ सव्वालाखाची मीदेखील सर्व गोष्टी बाहेर काढू शकतो. निश्चितच सर्वांसमोर मांडू शकतो”, असेही अनिकेत तटकरे यांनी म्हटले आहे.