अलिबाग : कुसुंबळेतील स्वागत कमानीला , माजी सभापती स्व.प्रमोद ठाकूर यांचे नाव

By Raigad Times    28-Jan-2025
Total Views |
 alibag
 
अलिबाग | अलिबाग तालुक्यातील कुसुंबळे गावातील स्वागत कमानीला अलिबाग पंचायत समितीचे माजी सभापती स्व. प्रमोद ठाकूर यांचे नाव देण्यात आले आहे. कमानीचा नामकरण सोहळा रविवारी, २६ जानेवारी रोजी रोजगार हमी आणि फलोत्पादन विकास मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
 
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केणी, कामगार नेते दीपक रानवडे, माजी जिल्हा परीषद सदस्या मानसी दळवी, भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड. महेश मोहिते, पनवेल महापालिकेच्या भाजप नगरसेविका राजश्री वावेकर, शिवसेना महिला आघाडीच्या संजीवनी नाईक, जुईली दळवी, कुसुंबळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच रसिका केणी आदिंसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
 
यावेळी बोलताना मंत्री भरत गोगावले यांनी स्व. प्रमोद ठाकूर यांनी शेतकरी कामगार पक्षासाठी केलेल्या निःस्वार्थी कामाचे कौतुक केले. ठाकूर यांनी केलेल्या कामाची जाणीव शेकापने ठेवली नाही. परंतु राजा केणी यांनी विरोधक असूनही ठाकूर यांच्या कामाची दखल घेतली विरोधक कसा असावा याचे उदाहरण म्हणजे राजा केणी असल्याचे गोगावले म्हणाले.
 
शेकापने प्रमोद ठाकूर यांची शेवटच्या दिवसात अवहेलना केल्याची टीका आमदार महेंद्र दळवी यांनी केली. प्रमोद ठाकूर हे आमचे राजकीय विरोधक होते परंतु आम्ही चांगले मित्र होतो. शेकापने त्यांचा वापर करून घेतला आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याची टीका त्यांनी केली.
 
प्रमोद ठाकूर यांचे जवळचे मित्र महेंद्र वावेकर यांनी त्यांचा जीवनपट उलगडताना अनेक आठवणी जागवल्या. मिश्कील खटयाळ स्वभावाचे ठाकूर रात्री अपरात्री लोकांच्या मदतीला धावून जात होते, कोरोना काळातही त्यांनी रूग्णांची सेवा केली. त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे जे जनमानसात लोकप्रिय होते त्यांच्या कामाची दखल घेतल्याबददल त्यांनी राजा केणी यांचे आभार मानले. यावेळी मंत्री झाल्याबद्दल भरत गोगावले यांचा सत्कार करण्यात आला.
 
दिव्यांगांना लाभाचे वितरण
ग्रामपंचायत निधीतील अपंगांसाठी राखीव १५ टक्के निधी वितरणात कुसुंबळे ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. ग्रामपंचायत हद्दीतील ५० दिव्यांगांना लाभ निश्चित करण्यात आला आहे. या लाभाचे वितरण याच कार्यक्रमात मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.