कर्जत | कर्जत रेल्वे स्थानकातून पुण्याकडे जाणार्या रेल्वे लाईनवर एक नंबर फलाट संपल्यावर यार्डात जाणार्या मालगाडीचे इंजिन घसरले. त्यामुळे पुण्याकडे जाणार्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांना थोडा उशीर झाला. ही घटना सोमवारी (२७ जानेवारी) पावणेपाचच्या सुमारास घडली.
सव्वाचार तासांत इंजिन पुन्हा रुळावर आणण्यात यश आल्याने रेल्वे वाहतूक पूर्ववत झाली. मुंबई, कल्याण, पनवेलहून पुण्याकडे जाणार्या लांब पल्ल्याच्या गाड्या थांबा असो वा नसो कर्जत स्थानकात डबल इंजिन लावण्यासाठी एक नंबर फलाटावर येऊन थांबतात. सोमवारी ४ वाजून ४७ मिनिटांनी एक मालगाडी एक नंबर फलाटावरून जात होती.
फलाट संपल्यावर लगेचच या मालगाडीचे इंजिन रुळावरुन घसरले आणि हा रेल्वे मार्ग बंद झाला.त्यामुळे मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस कर्जत स्थानकाच्या अलीकडे तब्बल पंचवीस मिनिटे थांबविण्यात आली. त्यानंतर ही गाडी दोन क्रमांकाच्या फलाटावर आणण्यात आली.
तिच्या मागोमाग येणारी मुंबई-पुणे डेक्कन क्विन आणि मुंबई पुणे सिंहगड एक्स्प्रेससुध्दा दोन नंबर फलाटावर आणल्याने या गाड्यांना थोडा उशीर झाला. घसरलेले इंजिन पुन्हा रुळावर आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते. तब्बल सव्वाचार तासांनी म्हणजे नऊच्या सुमारास हे इंजिन रुळावर आणण्यात रेल्वे कर्मचार्यांना यश आले. त्यानंतरच्या गाड्या नेहमी प्रमाणे एक नंबर फळटावरून पुण्याकडे रवाना करण्यात आल्या.