अलिबाग | माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमाचा प्रोटोकॉल रायगड जिल्हा प्रशासनाकडून तोडण्यात आल्याचा आरोप माजी आमदार पंडित पाटील यांनी केला आहे. त्यांच्यासाठी खास जीआर काढला आहे का? असा सवाल करतानाच, सत्तेपुढे शासनाचे अधिकारी हतबल झालेत, असे चित्र असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
मंत्री अदिती तटकरे यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आल्यामुळे शिवसेना आमदारांनी जोरदार विरोध दर्शविला. यानंतर अवघ्या २४ तासांत अदिती तटकरे यांची केलेली नियुक्ती शासनाने स्थगित केली. असे असले तरी २६ जानेवारीला झालेल्या प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणाचा मान सरकाने मंत्री अदिती तटकरे यांना दिला. मात्र याचवेळी त्यांच्यासोबत त्यांचे बंधू माजी आमदार अनिकेत तटकरेदेखील ध्वजस्तंभाजवळ गेल्याने वादाचा विषय ठरला आहे.
शेकाप नेते तथा अलिबागचे माजी आमदार पंडित पाटील यांनी यावरुन जिल्हा प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.ध्वजारोहण कार्यक्रमाचा एक प्रोटोकॉल असतो, प्रमुख अतिथी ध्वजारोहण करत असताना, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक त्यांच्याशेजारी उभे असतात. तर स्वातंत्र्य सैनिक, आमदार, माजी आमदार, अन्य अधिकारी, पत्रकार यांच्यासह निमंत्रकांसाठी अन्य ठिकाणी बसण्याची व्यवस्था करण्यात येते.
असे असताना, माजी आमदार अनिकेत तटकरे हे ध्वजारोहण स्तंभाजवळ कसे गेले? अनिकेत तटकरे यांच्यासाठी सरकारने नवीन जीआर काढला आहे का? असा सवाल पंडित पाटील यांनी उपस्थित केला आहे. ही घटना योग्य नाही. २६ जानेवारीचा कार्यक्रम संवेदनशील असतो. त्याचे प्रोटोकॉल, काही नियम असतात; पण शासनाचे अधिकारी सत्तेपुढे हतबल झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
अशी घटना भविष्यात होऊ नये म्हणून राज्याचे मुख्यसचिव यांनी याची गंभीर दखल घ्यावी आणि या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे. तटकरे कुटुंबाकडे बरीच वर्षे पालकमंत्री, मंत्रिपद राहिले आहे. अनिकेत तटकरे हे तालिकेचे अध्यक्ष होते. स्वतः आमदार होते. त्यांच्याकडून ही गोष्ट अवधानाने घडली की कसे? पण राज्य शासनाचे अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी आहेत, त्यांनी त्यांना थांबवायला पाहिजे होते, असेही पंडित पाटील यांनी म्हटले आहे.
अनिकेत तटकरे माझे कोणी शत्रू नाहीत; पण म्हातारी मेल्याचे दुःख नाही, काळ सोकावता कामा नये, अशी आपली भावना असल्याचे पंडित पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान, यासंदर्भात रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.