रोहा | रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीतील प्रख्यात कारखाना ह्युबॅक कंपनीच्या बंद गोदामामध्ये बुधवारी (१ जानेवारी) रात्री आठच्या सुमारास भीषण आग लागली. आगीच्या भडका उडाला होता. मोठमोठे धुराचे लोट आकाशाच्या दिशेने दिसत होते. या आगीत कंपनीचा लाखो रुपयांचे मटेरियल जळून खाक झाले.
धाटाव औद्योगिक वसाहतीत लागलेल्या आगीच्या मोठमोठ्या ज्वाळा व धुराचे लोट अगदी दूरवरुन दिसत असल्यामुळे रोठ बुद्रुक गावातील व रोठ खुर्द येथील ग्रामस्थ भयभीत झाले होते. मात्र ग्रामस्थ प्रसंगावधान दाखवून कंपनीच्या मदतीला धावून आले. लागलेली आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेड गाडी व फोम तसेच डिएमसीसी कंपनीसह अनेक कारखान्यांनी विविध टिम पाचारण केल्या व त्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणली.
सर्व उत्पादन प्रकल्प सुरक्षित स्थितीमध्ये आणले आहेत. कंपनीचावीजपुरवठा खंडीत ठेवण्यात आलेला आहे. कामकाज सुरू ठेवण्यासाठी आम्ही स्थानिक अधिकार्यांच्या संपर्कात आहोत, अशी माहिती कारखाना साईट हेड अन्सार डांगे यांनी दिली. कंपनीने झालेल्या घटनेची माहिती रोठ बुद्रुक गावाला दिलेली नाही. कंपनी व्यवस्थापनाने ग्रामस्थांच्या जीवाशी खेळू नये, असा इशारा भाजपा रोहा तालुका कोषाध्यक्ष राजेश डाके यांनी दिला.