पोलादपूर | मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूरजवळील कशेडीच्या दोन्ही बोगद्यातून पूर्ण क्षमतेने सुरक्षित आणि वेगवान करण्याच्या दृष्टीने बांधकाम प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. हे प्रतिक्षेत असलेले दोन्ही बोगदे नवीन वर्षात २६ जानेवारीपासून पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले होणार आहेत, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी दिली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाट येथील प्रतिक्षेत असलेले दोन्ही बोगदे प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी सुरु करण्यात येणार आहेत. कशेडी घाटाला पर्याय म्हणून येथील दोन्ही बोगद्याचे काम प्रगतीपथावर आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात येणार्या भाविकांसाठी एक बोगदा सुरु करण्यात आला होता. मात्र त्यांनतर काही त्रुटी आढळल्याने दोन्ही बोगदे बंद करण्यात आले होते.
वीजेची कामे करण्यासाठी आणि बोगद्यात होत असलेल्या पावसाच्या पाण्याची गळतीमुळे हे बोगदे चर्चेचा विषय बनले होते. कशेडी घाटाला पर्याय म्हणून ओळखले जाणारे हे दोन्ही बोगदे लवकरच वहातूक सेवेसाठी खुले होणार आल्याने प्रवास कमी वेळेत आणि सुरक्षित होण्यास मदत होणार आहे. कशेडी येथील दुसर्या बोगद्यात आता पंखे बसविण्याचे काम हाती घेण्यात आले असून रायगडमधील भोगावजवळ एका पुलावर स्लॅब टाकण्याचे कामही सुरू आहे. कशेडी बोगद्यातील विद्युतीकरणासह इतर प्रलंबित कामे लवकरच पूर्ण करण्यात येत आहेत. २६ जानेवारीला हे दोन्ही बोगदे वाहतुकीसाठी खुले होणार आहेत.