जमीन नसलेल्या बेघरांना... घरकुलाचा लाभ प्राधान्याने द्या!

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची सूचना

By Raigad Times    30-Jan-2025
Total Views |
mumbai
 
मुंबई | प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्व घरकुल लाभार्थ्यांना आपल्या हक्काचे घर मिळवून देण्याच्या दृष्टीने यंत्रणेने काम करावे, यामध्ये जमीन नसलेल्या बेघरांना घरकुल योजनेंतर्गत प्राधान्याने लाभ देण्याच्या सूचना ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या आहेत. मंत्रालयात ग्रामविकास व पंचायत राज विभागाशी संबंधित कोकण विभागाची आढावा बैठक झाली.
 
बैठकीस ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम, ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कोकण विभागीय आयुक्त राजेश देशमुख, यांच्यासह कोकण विभागातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक, संबंधित अधिकारी उपस्थित होते.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यातील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल निर्मितीचे काम उत्तम दर्जाचे आणि गतीने होण्यावर विशेष लक्ष देण्यात येत आहे. हे लक्षात घेऊन शासनाच्या शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत ग्रामविकास विभागाच्या विविध योजनांची अधिक पारदर्शकतेने आणि गतिमानतेने अमंलबजावणी करावी. राज्याला वीस लाख घरकुल निर्मितीचे उद्दिष्ट मिळाले आहे.
 
सर्व पात्र लाभार्थ्यांच्या घरकुलास मान्यता देऊन घरकुल बांधकाम तत्परतेने सुरू करावे. ज्या लाभार्थ्यांकडे जमीन नाही, बांधायला जागा नाही असे लाभार्थी प्रथम प्राधान्याने घ्यावे. तसेच जागा असलेल्या मात्र घर नसलेल्या लाभार्थीची स्वतंत्र यादी करावी, असे सूचित करुन गोरे यांनी सांगितले की, घरकुल मंजूरीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर गावागावांत ग्राम सभांमध्ये याबाबत माहिती द्यावी असेही त्यांनी म्हटले आहे.
घरकुल लाभार्थ्यांच्या नावांची यादी ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात लावावी..
मंत्री गोरे म्हणाले, घरकुल लाभार्थ्यांच्या नावांची यादी ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात लावावी. जेणेकरून गावातील सर्वांना घरकूल लाभार्थ्यांची माहिती होईल. त्याचप्रमाणे घरकुलाचे हप्ते सर्व लाभार्थ्यापर्यंत वेळेत पोहचवावेत.
 
सर्वेक्षण करताना प्रत्येक पात्र लाभार्थ्याला योजनेचा लाभ होईल या दृष्टीने सर्वेक्षणाचे काम करावे. कोकण पट्ट्यात गावातील गावठाण जमिनी घरकुल योजनेसाठी वापराव्यात. त्याचप्रमाणे पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेंतर्गतही घरकुलांचा लाभ लाभार्थ्यांना द्यावा. योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी काटेकोर नियोजन करावे.
योजनांची पारदर्शक आणि लोकाभिमुखपणे अमंलबजावणी करावी
ग्रामविकास विभागाच्या ग्रामीण जीवन्नोन्नती अभियानांतर्गंत स्वयं सहायता समूहाचे मोठे जाळे तयार झालेले आहे. त्यात ग्राम संघ, प्रभाग संघ, शेतकरी उत्पादक कंपनी यामध्ये सहभागी सर्व गटांची सक्रियता वाढविण्यावर यंत्रणानी अधिक लक्ष द्यावे.
 
हे सर्व गट सक्रिय होण्यासाठी समन्वयपूर्वक कार्यपद्धती स्वीकारुन कामांची गती वाढवावी. क्षेत्रीय अधिकार्‍यांनी प्रभाग संघाना भेटी द्याव्यात. विभागांतर्गत विविध योजनांची पारदर्शक आणि लोकाभिमुखपणे अमंलबजावणी करावी, अशा सूचनाही मंत्री गोरे यांनी यावेळी दिल्या.
यंत्रणांनी स्थळपाहणी वेळेत करावी
ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांनी घरकुलाचे हप्ते नियमितपणे लाभार्थ्यांना मिळतील याकडे यंत्रणेने कटाक्षाने लक्ष द्यावे, असे सूचित करुन सांगितले की, कामांची वेळेत आणि दर्जेदार पूर्तता होण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी प्रत्यक्ष पाहणीवर भर द्यावा.
 
ग्रामविकास विभागाच्या लखपती दिदी योजनेसह इतर सर्व योजनांची व्यापक प्रमाणात अंमलबजावणी करून उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काम करण्याचे निर्देश कदम यांनी दिले.