कर्जत | रायगडच्या पालकमंत्री पदावर सुरू असलेले रुसवे फुगवे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाला विरोध दर्शविणारे आहे. आमदारांनी पक्ष नेतृत्वावर विश्वास ठेवायला हवा, पण ते गुवाहाटी येथे पळून गेलेल्यांना कसे माहिती असणार? असा टोला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शिवसेना आमदारांना लगावला आहे. कर्जत येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात अंबादास दानवे बोलत होते.
राज्य सरकारचा अध्यादेश न पाळणारे रायगड जिल्ह्यात अधिक आहेत. पालकमंत्री पदाबाबत राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशांना स्थगिती द्यावी ही बहुमतात असलेल्या सरकारवर नामुष्की आहे. राज्याचे मुख्यमंत्री यांनी पालकमंत्रीपदाबाबत काढलेल्या अध्यादेशाला स्थगिती देणे म्हणजे मुख्यमंत्री आणि भाजप यांना विरोध करण्यासारखे असल्याची टिका दानवे यांनी केली आहे.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवसैनिक यांना मार्गदर्शन करताना कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध आणि नियमित प्रयत्नांना प्राधान्य द्यावे असे आवाहन केले. तसेच राज्य सरकार काय करते, याच्या प्रत्येक कृतीकडे लक्ष देण्याच्या सूचना दानवे यांनी कार्यकर्त्यांना केल्या. एसटी भाडेवाढीबद्दल शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरले पाहिजे, असे निर्देश अंबादास दानवे यांनी देतानाच कार्यकर्त्यांनी लढाईसाठी नेहमी तयार राहण्याचा सल्ला दिला.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकांतील जिद्द आणि निष्ठेने काम करावे असे सूचित केले शिवसेनेतून बाहेर गेलेल्या गद्दारांवर लक्षठेवण्याचे निर्देश देत संघटना बळकट करत मतदारांशी संपर्क वाढवणे ही प्रत्येक शिवसैनिकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना हिंदुत्ववादी विचारांशी बांधील असून शिवसैनिकांनी मनोबल उंचावून संघटनेच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करावे.
रायगड जिल्ह्यात सदस्य नोंदणी कमी झाल्याचा उल्लेख करत त्यांनी कार्यकर्त्यांना अधिकाधिक सदस्य नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहन दिले. यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख संदेश भोईर, उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, जिल्हा महिला आघाडी संघटीका सुवर्णा जोशी, कर्जत तालुका उत्तम कोळंबे, खालापूर एकनाथ पिंगळे, संपर्क प्रमुख भीमसेन बडेकर, कर्जत तालुका संघटक बाबू घारे, माजी शहर प्रमुख मोहन ओसवाल, संतोष पाटील, जगदीश ठाकरे, महिला आघाडी उपजिल्हा संघटक पाटील, तालुका संघटक करुणा बडेकर,माजी सरपंच प्रमिला बोराडे आदी उपस्थित होते.