नवी मुंबईत कुष्ठरुग्ण शोध अभियान , १४ फेब्रुवारीपर्यंत मनपा राबविणार मोहीम

By Raigad Times    31-Jan-2025
Total Views |
 new mumbai
 
नवी मुंबई | कमीत कमी कालावधीत समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणणे व कुष्ठरोगाबाबत समाजात जनजागृती करणे या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ३० जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत "कुष्ठरुग्ण शोध अभियान” ही मोहीम नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात राबविण्यात येत आहे.
 
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत ही मोहीम राबविण्यात येणार असून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली १८१ पथकांच्या माध्यमातून ९८ हजार ५४२ घरातील ३ लाख ३७ हजार ५२२ लोकसंख्येला भेटी देऊन नागरीकांची तपासणी करून जनजागृती करण्यात येणार आहे. प्रत्येक पथक दररोज ३० घरांना प्रभावीपणे भेट देऊन माहिती संकलीत होईल अशा प्रकारे पथके तयार केली आहेत.
 
प्रत्येक पथकामध्ये एक महिला व एक पुरूष कर्मचारी असणार आहेत. प्रत्येक घरातील महिलांची तपासणी महीला कर्मचार्‍यामार्फत आणि पुरुषांची तपासणी पुरूष कर्मचार्‍यांमार्फत करण्यात येणार आहे. कुष्ठरोगाकरीता त्वचेवर फिकट, लालसर बधीर चट्टा, त्याठिकाणी घाम न येणे, जाड, बधीर तेलकट, चकाकणारी त्वचा, त्वचेवर गाठी असणे, कानाच्या पाळया जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण बंद न करता न येणे, इ. लक्षणे विचारुन तपासणी होणार आहे.
 
यामध्ये कुष्ठरोगाची लक्षणे आढळल्यानंतर वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे निदानाकरीता पाठविण्यात येणार आहे. नमुंमपा कार्यक्षेत्रात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यक्षेत्राची निवड केली असून यामध्ये झोपडपट्टी, बांधकाम मजूर, दगडखाणी इ. भागाचा समावेश केला आहे.
 
त्यानुसार ३ लाख ३७ हजार ५२२ लोकसंख्येमध्ये १८१ पथकांद्वारे मोहीम कालावधीत भेटी देण्यात येणार आहेत. या अभियानामुळे समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरीत औषधोपचाराखाली आणणे, नवीन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडित करून होणारा प्रसार कमी करणे, कुष्ठरोग दुरीकरणाचे ध्येय साध्य करून कुष्ठरोग निर्मुलनाच्या दिशेने वाटचाल करणे हे उद्दीष्ट्य साध्य करण्यात येणार आहे. तरी सदर मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.