अलिबाग | इंधन संपल्यामुळे फ्लाय ओव्हर पुलावर साईड घेऊन उभ्या असलेल्या स्कॉर्पिओला टोईंग व्हॅनने जोरदार धडक देत, बाजूला उभ्या असलेल्या सहा जणांना फरफटत नेले. या भीषण अपघातात महाड येथील चार जणांचा मृत्यू झाला असून, तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. ही धडक इतकी जोरदार होती की स्कॉर्पिओ गाडी जवळपास पन्नास फूट लांब फेकली गेली.महाड परिसरातील सहा तरुण गुरुवारी (२ जानेवारी) रात्री महाडकडून मुंबईकडे निघाले होते.
रात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्यांची स्कॉर्पीओ मुंबई-गोवा हायवेवर वीर रेल्वे स्टेशनसमोरील फ्लायओव्हरवर आली. याठिकाणी गाडीतील डिझेल संपले आणि गाडी बंद पडली. त्यामुळे बंद पडलेली गाडी पुलावरच थोडी बाजूला उभी करुन, गाडीतील सहाजण गाडी शेजारी उभे होते. यावेळी चिपळूण ते पनवेलकडे जाणारी टोइंग व्हॅन चालकाने बंद स्कॉपिओला मागून जोरदार धडक दिलीआणि बाजूलाच उभ्या असलेल्या सहा जणांना अक्षरशः पाच ते दहा फूट फरफटत नेले.
यामध्ये गंभीर जखमी होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दोन जखमींवर उपचार सुरु आहेत. टोईंग व्हॅनच्या धडकेने स्कॉपिओ जीप सुमारे ५० फूट लांब उडवली गेली आणि सर्व्हीस रोडच्या पलिकडे खड्ड्यात पडली. मृतांमध्ये सूर्यकांत सखाराम मोरे (रा. नवेनगर, महाड), साहिल नथुराम शेलार (वय २५ रा. कुंभारआळी, महाड, आणि प्रसाद रघुनाथ नातेकर (वय २५ रा.कुंभारआळी, महाड) समिप सुधीर मिंडे वय (वय ३५, रा. दासगाव) यांचा समावेश आहे.
तर, सुरज अशोक नलावडे (वय ३४, रा. चांभारखिंड, महाड) आणि शुभम राजेंद्र माटल हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघाताची माहिती मिळताच महाड तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी टोइंग व्हॅनच्या चालकास ताब्यात घेण्यात आले आहे. अपघाताचा अधिक तपास महाड तालुका पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच झालेल्या या भीषण दुर्घटनेमुळे महाड परिसरात दुःखाचे सावट पसरले पसरल्याचे पहायला मिळाले.