अलिबाग | कागदपत्रांमध्ये खाडाखोड करून शासकीय निधीचा अपहार केल्याच्या आरोपाखाली अलिबाग तालुक्यातील कुर्डूस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांच्याविरोधात पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलिबाग पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दाजी दाइंगडे यांनी ३ जानेवारी रोजी पोयनाड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांनी केलेल्या तक्रारीनुसार कुर्डूस ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच अनंत पाटील आणि ग्रामविकास अधिकारी सुनील म्हात्रे यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून, अभिलेखामध्ये खाडाखोड करून ग्रामपंचायत निधी, आणि चौदाव्या वित्त आयोग निधी असा २८ लाख ७० हजार ४५८ इतक्या रकमेचा अपहार केल्याची तक्रार फिर्यादीमध्ये केली आहे.
१३ नोव्हेंबर २०१९ ते ६ जानेवारी २०२१ या कालावधीत हा अपहार झाला असल्याचा उल्लेख त्यांनी तक्रारीत केला आहे. पोयनाड पोलीस ठाण्यात या प्रकरणी अनंत पाटील व सुनील म्हात्रे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक अशोक मरस्कोले अधिक तपास करीत आहेत.
ग्रामस्थांच्या तक्रारीवरून चौकशी अनंत पाटील व सुनील म्हात्रे यांनी पदाचा गैरवापर करून ग्रामपंचायत निधी तसेच केंद्र सरकारकडून आलेल्या चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीचा अपहार केला असून त्याची योग्य ती चौकशी करून त्यांच्या विरोधात फौजदारी खटला दाखल करावा असा अर्ज गावातील सुनील पिंगळे व मिलींद पाटील यांनी कोकण आयुक्तांकडे जानेवारी २०२१ मध्ये केला होता.
त्यानुसार रायगड जिल्हा परीषदेने त्याची चौकशी सुरू केली. त्यावेळच्या गटविकास अधिकारी डॉ. दिप्ती देशमुख यांनी चौकशी करून अनंत पाटील व सुनील म्हात्रे यांनी निधीचा अपहार केला असल्याचा अहवाल दिला होता. सुनील म्हात्रे यांची खातेचौकशी लावण्यात आली. त्याअनुषंगाने कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आलेल्या सुनावणीच्या वेळी ग्रामविकास अधिकारी सुनील म्हात्रे यांनी पाच दोषारोप मान्य केल्याचा अहवाल सहाय्यक आयुक्त (कोकण) यांनी दिला आहे. त्यावरून हा गुन्हा पोयनाड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.