मुरुडच्या पद्मदुर्गावर अवतरली शिवशाही

By Raigad Times    06-Jan-2025
Total Views |
 Murud
 
मुरुड जंजिरा | मुरुड येथील पद्मदुर्ग किल्ल्यावर रविवारी शिवशाही अवतरल्याचे चित्र पहायला मिळाले. छत्रपती शिवरायांची प्रतिमापूजन झाल्यानंतर त्यांची पालखी वाजत गाजत पालखी गडाच्या बुरुजावरून फिरवण्यात आली. रेवदंडाच्या चवरकर बंधूनी तलवारबाजी, भाले फेकची झलक दाखवली.
 
यावेळी सर्वचजण शिवकाळात हरवून गेले. पद्मदुर्ग किल्ल्यावर पावसाळ्यानंतर मोठ्या प्रमाणावर गवत वाढुन अस्वच्छता पसरलेली असते. किल्लास्वच्छ रहावा व किल्ल्याची पडझड होऊ नये, याकरिता मुरुड पद्मदुर्ग जागर संवर्धन समिती व कोकण कडा मित्रमंडळ यांनी १५ वर्षांपूर्वी जागर कार्यक्रम सुरु केला. रविवारी पद्मदुर्ग किल्ल्यावर सकाळी शिवप्रेमी शेखरमामा फरमान यांच्या हस्ते गडपूजन करण्यात आले.
 
शिवप्रतिमेचे विधिवत राजपुरोहित प्रकाश स्वामी जंगम यांच्या मंत्रउचारात केले गेले. शिवआरती करण्यात आली सोबतच, किल्ल्यातील कोटेश्वरी देवीचे पूजन करण्यात आले. छत्रपती शिवरायांची पालखी कोटेश्वरीचे मूळ स्थान असलेल्या देवीच्या देवळात दर्शनाला नेण्यात आली.
 
सर्व शिवप्रेमींनी शिवगर्जना करत ढोल ताशाच्या गजरात देवीचा उदो उदो केला. रेवदंडाच्या चवरकरबंधू व त्यांच्या सहकार्‍यांनी तलवारबाजी, भाले फेक, शिवशाहीची आठवण करून दिली.यावेळी महाडचे शिवप्रेमी कोकण कडाचे अध्यक्ष सुरेश पवार, पद्मदुर्ग जागर संवर्धन समिती अध्यक्ष अशील ठाकूर, संकेत वडके, रोहित पवार, शेखर मामां फरमान, प्रमोद जयश्री मधुकर राऊळ (बंदर निरीक्षक), अमर गुरव (श्रीवर्धन), शिवप्रेमी प्रमोद भायदे, विजय वाणी, विजय सुर्वे, ज्ञानेश्वर काकडे, महेश मोरे राहुल कासार, रुपेश जामकर, गणेश सतविडकर, संकेत आरकशी, मंगेश रणदिवे, सतेज विरुकुड, विरेंद्र गायकर, विजय वाणी, अच्युत चव्हाण, प्रदिप बागडे, संदिप घरत, सुनील शेळके, रुपेश दांडेकर, पद्मदुर्ग जागर व गड संवर्धन समिती, मुरुड, संकेत आरकशी व ग्रुप खारअंबोली यांच्यासह शिवप्रेमी मावळे मोठ्या संख्येने उपस्थित होते.