ठेकेदाराच्या चुकीमुळे प्लास्टिक पिशव्यांना आग माथेरानमधील घटना; वृक्षसंपदेची मोठी हानी

ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी

By Raigad Times    08-Jan-2025
Total Views |
matheran
 
माथेरान | शहरात कचरा जाळण्यास मनाई आहे. तसेच इतरत्र कचरा साठवून ठेवण्यास आणि कचरा टाकण्यास मनाई आहे. मात्र माथेरान नगरपरिषद क्षेत्रातील रस्त्यांच्या कामासाठी आणलेल्या सिमेंटच्या रिकाम्या पिशव्या आर्टिस्ट पॉइंट येथे साठवून ठेवण्यात आल्या होत्या. दोन वर्षापासून पडून असलेल्या पिशव्या उचलण्यात नसल्याने अखेर त्या पिशव्यांना आग लागली आणि वृक्षसंपदेची मोठी हानी झाली.
 
याप्रकरणी प्लास्टिक पिशव्या साठवून ठेवणार्‍या संबंधित ठेकेदारावर नगरपरिषद कोणती कार्यवाही करते? याकडे लक्ष लागून राहिले आहे. माथेरान शहरात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या निधीमधून रस्त्यांवर पेव्हर ब्लॉक लावण्यात आले. ते पेव्हर ब्लॉक दस्तुरी वाहनतळ येथून शहरात आणण्यासाठी सिमेंटच्या भरल्या जातात. त्यांनतर घोड्याच्या पाठीवरून ते पेव्हर ब्लॉक रस्त्यांची कामे सुरू असलेल्या ठिकाणी साठवून ठेवले जातात.
 
अनेकवेळा कामे करताना पेव्हर ब्लॉक हे पिशवीमधून बाहेर काढले जातात. त्यावेळी संबंधित सिमेंटच्या रिकाम्या पिशव्या या उचलून पुन्हा दस्तुरी मालधक्का येथे नेण्याची आवश्यकता असते. मात्र ठेकेदार आणि त्यांचे कर्मचारी हे रिकाम्या झालेल्या पिशव्या टाकून कामचुकारपणा करीत असतात. तसाच प्रकार माथेरान शहरातील पे मास्टर पार्क रस्ता तयार करताना झाला आहे.
 
दोन वर्षापूर्वी हा रस्ता ले पेव्हर ब्लॉकचा बनविण्यात आला आणि त्यावेळी त्या ठिकाणी असलेल्या आर्टिस्ट पॉइंट येथील कोपर्‍यावर त्या रिकाम्या पिशव्या टाकून देण्यात आल्या होत्या. त्या रिकाम्या पिशव्या दोन वर्षे तेथेच पडून होत्या अखेर त्या पिशव्यांना आज कोणी अज्ञात व्यक्तीने आग लावली. त्या आगीमुळे आर्टिस्ट पॉइंट भागातील अनेक झाडांना आगीने आपल्या भक्ष्यस्थानी केले.
 
या आगीमुळे आजूबाजूची झाडे जळून गेली आहेत. त्या प्लास्टिक पिशव्या तेथे टाकण्यात आल्याने पर्यावरणाचादेखील र्‍हास झाला आहे. आग लागल्याची माहिती मिळताच माथेरान नगरपरिषदेचे अग्निशमन केंद्र तत्काळ तेथे दाखल झाले. आगीवर नियंत्रणमिळविण्यात यश आले असले तरी आजूबाजूची झाडे जळून खाक झाली. दरम्यान, याप्रकरणी माथेरान नगरपरिषद संबंधित ठेकेदार कंपनीवर कोणती कारवाई करणार? याकडे लक्ष लागून राहिले आहे.
 
माथेरानमधील पर्यावरणप्रेमी तरुण राकेश कोकले हे आपल्या सहकारी यांच्यासह गेली दोन वर्षे माथेरानचे जंगलात फिरून प्लास्टिक पिशव्या जंगलातून दरीमधून बाहेर काढण्याचे काम करीत दुसरीकडे त्या ठिकाणी वर्षे दोन वर्षे पडून राहिल्याने त्या त्या ठिकाणी नवीन झाडे उगविण्याची प्रक्रिया पुढे जात नाहीत आणि जंगलाचा र्‍हास त्यामुळे होत असल्याचा आरोप कोकाले यांनी केले.