रेवस-करंजा पूल रखडण्याची शक्यता ? द्रोणागिरीला धक्का लावताच काम करा; ग्रामस्थांनी मागणी

By Raigad Times    08-Jan-2025
Total Views |
 uran
 
उरण | रेवस-रेड्डी महामार्गावरील रेवस-करंजा पुलाचे काम करताना ऐतिहासिक द्रोणागिरी पर्वताला धक्का लावू नये, अशी मागणी चाणजे प्रकल्पबाधित, करंजा आणि कोंढरी ग्रामस्थांनी केली आहे. द्रोणागिरीला हात लावण्याचा प्रयत्न केला तर काम बंद पाडणार, असा इशाराही देणात आला आहे. ग्रामस्थांच्या या भूमिकेमुळे रेवसरेड्डी महामार्ग रखडण्याची निर्माण झाली आहे.
 
या पार्श्वभूमीवर पनवेलचे उपविभागीय अधिकारी पवन चांडक यांनी, उरण तहसिल कार्यालयात संबंधित खात्याचे अधिकारी, शेतकरी यांच्यात मंगळवारी (७ जानेवारी) बैठकीचे आयोजन करण्यात आली होते. या बैठकीला एमएसआरडीसीचे बोराडे, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नरेश पवार यांच्यासह संबधीत खात्याचे अधिकारी उपस्थित होते. मुंबई-गोवा महामार्गाला पर्यायी ठरणारा रेवस ते रेडी सागरी महामार्गाची एकूण लांबी ४९८ किमी इतकी आहे.
 
सागरी महामार्गावरील सात खाडी पुलांच्या कामाचे भूमिपूजन निवडणुकीआधी.तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा हा सागरी महामार्ग असणार आहे. हा महामार्ग उरण तालुक्यातील चाणजे या परिसरातून जात असताना शेतकरी, ग्रामस्थ, सामाजिक संस्था यांना विश्वासात न घेता संपादन, जागेचा सर्व्हे करण्यास शासनस्तरावर प्रयत्न करत आहे.
 
उरण तालुक्यातील ऐतिहासिक ठेवा असणार्‍या द्रोणागिरी पर्वताला धक्का पोहोचविण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोप करत ग्रामस्थांनी कामाला विरोध दर्शविला. यावेळी चाणजे ग्रामपंचायत सरपंच अजय म्हात्रे, माजी सभापती अ‍ॅड. सागर कडू, माजी जिल्हा परिषद सदस्य सिताराम नाखवा, करंजा ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष थळी, उपाध्यक्ष देवीदास थळी, मेघनाथ थळी, मुळेखंड, कोंढरी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या बैठकीत ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व असलेल्या द्रोणागिरी पर्वत परिसरातून जाणार्‍या मार्गाला ग्रामस्थांनी कडाडून विरोध दर्शविला. त्यामुळे सागरी महामार्गाचे काम रखडले की काय? अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे.