खोपोली | शेकाप नेते जयंत पाटील यांच्या उपस्थितीत खोपोलीत झालेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या संवाद मेळाव्यात गोंधळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावरोधात खोपोली पोलीस ठाण्यात निवेदन देत, कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
८ फेब्रुवारी रोजी खोपोलीतील समर्थ मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या संवाद मेळाव्यात इशिका शेलार, बनिता सहा, भारती शहा, सीमा सावंत, यामिनी जोशी, सुरेखा नाईकर, सुहास वझरकर यांनी येऊन शेतकरी कामगार पक्षाचे क्रियाशील सदस्य नसतानाही कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार तथा शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील हे होते. तर माजी आमदार बाळाराम पाटील, शेकापचे जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, राज्य महिला कार्यकारिणीच्या अध्यक्षा ऍड. मानसी म्हात्रे यांच्यासह तालुका आणि जिल्ह्यातील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
इशिका शेलार यांनी खोपोली बाजारपेठेत जेष्ठ पत्रकार गोकुळदास येशीकर यांना मारहाण केल्याचा गुन्हा खोपोली पोलीस ठाण्यात दाखल असून गोंधळ घालून सभा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. या सर्वांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी शेकापच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. मेळाव्यात गोंधळ करण्याच्या हेतूनेच ही मंडळी आल्याचा आरोप शेकापचे तालुका चिटणीस किशोर पाटील यांनी केला आहे. तर निवेदन देण्याच्या बहाण्याने अरेरावी केल्याचे खालापूरच्या माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम यांचे म्हणणे आहे.