कोकणातील शेतकर्‍यांसोबत कृषिमंत्र्यांनी साधला संवाद , कृषी क्षेत्रात ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करणार-कृषिमंत्री कोकाटे

By Raigad Times    11-Feb-2025
Total Views |
 alibag
 
अलिबाग | शेतकर्‍यांचे जीवनमान अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी कृषी क्षेत्रात सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. राज्य शासन शेतकर्‍यांचे उत्पादन वाढविण्याबरोबरच त्यांच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी येत्या काळात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (‘एआय’चा) वापर करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन कृषीमंत्री अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांनी केले.
 
कृषिमंत्री कोकाटे यांच्या संकल्पनेतून प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी परिसंवादाचे आयोजन विभागीय पातळीवर करण्यात आले. या अंतर्गत कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकर्‍यांशी संवाद आणि चर्चा कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी (१० फेब्रवारी) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
 
alibag
 
यावेळी व्यासपीठावर कृषी आयुक्त सुरज मांढरे, कृषी संचालक रफिक नाईकवडी, कृषी सह संचालक अंकुश माने, कृषी रत्न पुरस्कार प्राप्त शेतकरी शेखर भडसावळे,अनिल पाटील, आत्मा प्रकल्प संचालक वंदना शिंदे उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना अ‍ॅड. कोकाटे म्हणाले, शेतकरी केंद्रस्थानी ठेवून कामकाज होण्यासाठी समस्या, अभिप्राय तसेच सूचना विचारात घेऊन कृषी विभागात शेतकरीभिमुख कामकाजासाठी बदल करण्यात येत आहेत.
 
शेतकरी व कृषी विभागाची सांगड घालून भविष्यात शेतीक्षेत्रात मोठया प्रमाणावर प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. कृषी विद्यापीठ यांनी केलेले प्रयोग, विकसित केलेले तंत्रज्ञान, हवामान बदल, पीक पद्धती याची माहिती तात्काळ शेतकर्‍यांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रभावी कार्यपद्धती वापरावी. समाज माध्यमे, विविध संदेश वहनाची साधने वापरावी. तसेच शेतकर्‍याशी सातत्याने संवाद ठेवावा. कृषी विभागाची कार्यपद्धती अधिक प्रभावी होण्याच्या अनुषंगाने तसेच कृषी धोरण बनविताना शेतकर्‍यांच्या अडचणी, समस्या तसेच सूचना व प्रस्ताव यांचा समावेश करण्याच्या उद्देशाने या संवाद चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
 
रासायनिक खतांच्या वापरातून मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी शेतकर्‍यांनी आधुनिक तंत्रज्ञानासह सेंद्रिय शेतीकडे वळावे, असे आवाहन करून राष्ट्रीय सेंद्रिय सह.संस्थेच्या माध्यमातून सेंद्रिय मालाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही अ‍ॅड. कोकाटे यांनी यावेळी सांगितले. या परिसंवादात कोकण विभागातील आंबा, काजू, नारळ, चिकू, फणस, सुपारी, भात उत्पादक शेतकरी, कृषी पर्यटन, सेंद्रिय शेती, भाजीपाला व फूलशेती अशा विविध क्षेत्रातील शेतकर्‍यांनी प्रगतशील व प्रयोगशील शेतकर्‍यांनी राज्याला दिशा देणार्‍या सूचना आणि अपेक्षा व्यक्त करताना, विविध योजनांचे थकित अनुदाने, खतांचे लिंकिंग, पीकविमा, पायाभूत आणि काढणीपश्चात सुविधांचा अभाव, पीकनिहाय अडी-अडचणी, पीक क्लस्टर आदीं महत्त्वपूर्ण विषयांसह शेतीतील आव्हाने, समस्या मांडल्या.
 
कृषिमंत्री कोकाटे यांनी ४ तास चाललेल्या या बैठकीत शेतकर्‍यांचे सर्व म्हणणे ऐकून घेतले. ज्या ठिकाणी बदल शक्य आहेत, त्या विभागाशी चर्चा करून सुधारणा करण्यात येईल. तसेच ज्या योजना किंवा धोरणे केंद्र सरकारशी संबंधित आहे, त्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस व पाठपुरावा करण्यात येईल. ज्या ठिकाणी धोरणात्मक निर्णय, निधीची आवश्यकता आहे त्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करून घेण्यात येतील असे आश्वासित केले.
 
कृषी आयुक्त सुरज मांढरे यांनी कृषी आयुक्तालयाच्या माध्यमातून शेतकरी केंद्रबिंदू मानून प्रभावी निर्णय, योजना यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. शेतकरी, विविध प्रयोगशील व्यक्ती, कृषी विद्यापीठ आणि शासन यांच्या संयुक्त प्रयत्नाने शेती मध्ये बदल घडवू शकतो. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे सांगितले. यावेळी शेतकर्‍यांकडून कृषी योजना, कृषी निविष्ठा, नैसर्गिक आपत्ती, कृषी बाजार व्यवस्थापन याबाबत परिसंवाद प्रश्नावली भरून घेण्यात आली. आत्मा प्रकल्प संचालक वंदना शिंदे यांनी आभार मानले.