शिवसेना, राष्ट्रवादीसारखे...शेकापचे दोन तुकडे होणार नाही! शेकाप नेते जयंत पाटील यांचा भाजपला टोला

शेकापशिवाय कोणत्याही पक्षाला जिल्हा परिषदेमध्ये यश मिळणार नाही!

By Raigad Times    11-Feb-2025
Total Views |
 poladpur
 
पोलादपूर | शेकापक्ष संपल्याच्या कितीही हाकाट्या द्या, शेकापक्षाला राखेतून फिनीक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा भरारी घ्यायचे माहिती आहे... शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्या, काँग्रेसमधून फुटलेल्या राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी झाल्या. तसे शेकापक्षाचे दोन शेकापक्ष होणार नाहीत, हे भाजप आणि अन्य पक्षात जाऊ पाहणार्‍या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवावे, असा टोला शेकाप नेते जयंत पाटील यांनी लगावला आहे.
 
मोरगिरी येथील संवाद मेळाव्यात जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांकडे संवाद साधला. यावेळी त्यांनी शेकापला सोडून जाणार्‍यांसोबत जनाधार नसेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. पोलादपूरमधून शेकापक्षाचा जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे सभापती निवडून आणण्याचे काम नवीन पिढीने केले, जे आधीच्या नेत्यांना जमले नव्हते, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. शेकापक्षाला सोबत घेतल्याशिवाय कोणत्याही पक्षाला रायगड जिल्हा परिषदेमध्ये अथवा पंचायत समित्यांमध्ये यश मिळणार नाही, असे भाकित त्यांनी केले.
 
यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील, नेते अतुल म्हात्रे, प्रदीप नाईक, सुरेश खैरे, महिला आघाडीप्रमुख अ‍ॅड. मानसी म्हात्रे, माजी राजिप अध्यक्षा सुप्रिया पाटील, जिल्हा बँकेचे संचालक एकनाथ गायकवाड, जगन्नाथ वाडकर, सरपंच शरद जाधव, वैभव चांदे, समीर चिपळूणकर, मधुकर जाधव, मनोहर पार्टे, बापू जाधव तसेच शेकापक्ष कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपच्या सोशल मिडीयावर डॉ. आंबेडकर ब्राह्मण सांगितले जातात आणि रायगडावरील ज्योतिबा फुले यांनी शोधलेल्या शिवसमाधीचा सोहळा कोणी चालवला आहे? हे लक्षात घ्यायचे आहे.
 
जयप्रकाश नारायण यांनी तरूण सुशिक्षितांना राजकारणात येण्याचे आवाहन केल्यानंतर तयार झालेल्या काँग्रेसविरोधी पक्षांची मोट बांधली गेली होती. जनसंघाकडून गांधीनगरमधून निवडणूक लढणार्‍या अडवणींनी भारतीय जनता पक्षाच्या निर्मितीचे काम केले. भाजपने जेव्हा जेव्हा मदत घेतली तेव्हा अन्य पक्षांची ताकद संपविण्याचे काम केले आहे. भाजप हा बहुजन समाजाचा पक्ष नाही असे सांगतानाच जयंत पाटील यांनी, सुरुवातीला तेथे (भाजपमध्ये) मोकळा श्वास घेता आला तरी पुढे गुदमरल्यासारखे होईल, असा इशारा शेकापच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. तालुक्यामध्ये काय सुरु आहे, हे मी आता बोलणार नाही, पोलादपूरमध्येच बोलेन, असेही त्यांनी म्हटले आहे.