१५ हजारांची लाच घेताना नेरळच्या मंडळ अधिकार्‍याला रंगेहात पकडले

संदीप भंडारे असे लाचखोर मंडळ अधिकार्‍याचे नाव

By Raigad Times    12-Feb-2025
Total Views |
KARJT
 
कर्जत | कर्जत तालुक्यातील महसूल विभागाचे नेरळ येथील मंडळ अधिकारी संदीप भंडारे यांना १५ हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले. नेरळ जवळील जिते येथील जमिनीची नोंद करण्यासाठी पैशाची मागणी केली होती. दरम्यान,जानेवारी महिन्यात कडाव येथील मंडळ अधिकारी चंद्रकांत केंदे यांना एक लाखाची लाच घेताना पकडले होते.
 
नेरळ जवळील दामत येथील रहिवाशी मुसेफ मुजाहित खोत यांनी जिते या गावच्या हद्दीत जमीन खरेदी केली होती.त्या जमिनीची नोंद गेली वर्षभर रखडली होती आणि त्यामुळे शेतकरी मुसेफ खोत हे सातत्याने मंडळ अधिकारी कार्यालयात येरफर्‍या मारत होते. त्यामुळे शेतकरी मुसेफ खोत यांनी नवी मुंबई लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.
 
त्यानंतर या तक्रारीची खात्री झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजता नवी मुंबई लाचलुचपत पथकाने नेरळ येथील मंडळ अधिकारी कार्यालयात सापळा रचला. त्यावेळी महसूल विभागाचे नेरळ येथील मंडळ अधिकारी संदीप भंडारे यांनी १५ हजाराची रोख रक्कम लाच म्हणून स्वीकारली. त्यावेळी लाच लुचपत विभागाचे पोलिस उप अधीक्षक नितीन दळवी,पोलिस निरीक्षक संतोष पाटील, पोलिस निरीक्षक अरुंधती येळवे यांच्या पथकाने मंडळ अधिकारी भंडारे यांना रंगेहात लाच घेताना पकडले.
 
नंतर नवी मुंबई लाचलुचपत विभागाच्या पथकाने सदर लाच प्रकरणी अटक केलेले संदीप भंडारे आणि त्यावेळी तेथे उपस्थित असलेले कर्मचारी यांना नेरळ पोलिस ठाणे येथे आणले. नेरळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात जानेवारी २०२५ मध्ये तालुक्यातील कडाव येथील मंडळ अधिकारी चंद्रकांत केंदे यांना एक लाखाची लाच घेताना पकडले होते.त्यामुळे कर्जत तालुक्यातील महसूल विभागाला लागलेला लाच घेण्याचा लागलेला शाप काही दूर होण्याचे नाव घेत नाही.