जिल्हाधिकारी किशन जावळे यांची परीक्षा केंद्राला अचानक भेट

By Raigad Times    12-Feb-2025
Total Views |
 alibag
 
अलिबाग | जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष किशन जावळे यांनी अलिबाग शहरातील बारावीच्या परीक्षा केंद्रांना अचानक भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. बारावी परीक्षेसाठी जिल्ह्यात एकूण ५० परीक्षा केंद्र असून ३१ हजार ८५७ विद्यार्थी बसले आहेत.
 
इंग्लिश विषयाची परीक्षा सुरू असताना जिल्हाधिकारी किशन जावळे आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड यांनी जनरल अरुण कुमार वैद्य महाविद्यालय येथील केंद्राला अचानक भेट दिली. त्यांनी तेथील सुरक्षा व्यवस्थेची व परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली.
 
परीक्षेतील गैरप्रकारांना सहकार्य करणार्‍यांविरोधात तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे, असे निर्देश जावळे यांनी केंद्रप्रमुखांना यावेळी दिले. कॉपीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत बाधा येत असल्याने असे प्रकार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने यावर्षी कठोर उपाय केले आहेत.