अलिबाग | रायगड जिल्हा नियोजनच्या बैठकीवरुन राष्ट्रवादी आणि शिवसेनेमधील वादाची चर्चा मंगळवारी माध्यमांत दिवसभर रंगल्या. प्रत्यक्षात नियोजनची बैठक झालीच नाही, तर जिल्ह्याच्या वार्षिक आराखडा घेतल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
पालकमंत्री नसल्यामुळे राज्यातील फक्त रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीच्या बैठका होऊ शकलेल्या नाहीत. महायुतीच्या सरकारमध्ये रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी मंत्री भरत गोगावले आग्रही आहेत, तर मंत्री आदिती तटकरे यादेखील रायगडच्या पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहेत. यावरून शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात रस्सीखेच सुरु आहे.
असे असतानाच मंगळवारी (११ फेबु्रवारी) रायगड जिल्हा नियोजन समितीची वार्षिक बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीला मंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या. मात्र, भाजप आणि शिवसेनेचा (शिंदे) एकही आमदार बैठकीला उपस्थित नसल्याने चर्चांना उधाण आले. प्रसारमाध्यमांनी याबाबत शिवसेनेच्या आमदारांना छेडले असता, ‘आम्हाला बैठकीला बोलवलेच नव्हते’, अशी माहिती दिली.
यावरुन यावरून शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात धुसफूस सुरु असल्याच्या उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या. मात्र, यानंतर अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिले आहे. रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक नव्हती तर जिल्ह्याच्या वार्षिक आराखड्याबाबतची ही वार्षिक बैठक होती. या बैठकीला रायगडातील कोणत्याही आमदारांना बोलावले नव्हते.
फक्त आदिती तटकरे आणि भरत गोगावले या दोन मंत्र्यांनाच बोलावण्यात आले होते, असे अजित पवार यांनी सांगितले. या बैठकीला पालक सचिव असतात. जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असतात. मात्र, काही पहायचे नाही आणि वेगवेगळ्या चर्चा सुरु करायच्या, अशा शब्दांत पवार यांनी त्रागा व्यक्त केला. जिल्हा नियोजन समितीच्या बैठका जिल्ह्याच्या स्तरावरही होत असतात, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान, बैठकीला न बोलावल्यामुळे शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांनी आश्चर्य व्यक्त केले होते.
रायगडावर ४० ते ५० हजार धारकरी आले होते. माझ्याच मतदारसंघात उंबरटपासून रायगडपर्यंत धारकरींची पाच दिवस पायी यात्रा होती. त्यामुळे या धारकरींच्या स्वागतासाठी उपस्थित राहणे आवश्यक होते. त्यामुळे बैठकीला येणार नाही हे मी आधीच सांगितले होते. मुख्यमंत्र्यांनाही याबाबतची माहिती दिली होती. - भरत गोगावले, रोहयो मंत्री